fbpx

फडणवीसांचा ताफा अडवत शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जून २०२१ ।  विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज (मंगळवारी) नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुक्ताईनगर तालुक्याच्या दौर्‍यावर आले आहेत. या दौऱ्या दरम्यान, एका तरुण शेतकऱ्याने ताफ्यातील गाड्या अडवत विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.योगेश पाटील असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत असे की, मुक्ताईनगर तालुक्यातील मेळसांगवे येथील रहिवासी योगेश पाटील याची मेळसांगवे शिवारात केळीची शेती आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे त्याच्या शेतातील सुमारे 20 हजार केळीच्या झाडांचे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तालुक्यात पाहणी दौरा केला. त्यावेळी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र, त्यानंतरही योगेश पाटील याच्या शेतीचे पंचनामे झाले नाहीत.

त्यानंतर आज (मंगळवारी) राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नुकसानीची पाहणी करण्यासाठी तालुक्याच्या दौर्‍यावर आले आहेत. त्यांनी देखील रस्त्यावरील शेतांची धावती पाहणी करून काढता पाय घेतला. आपल्या शेतात पाहणी केली नाही म्हणून त्याचा संताप अनावर झाला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचा ताफा उचंदा परिसरातून रस्त्यावरून जात होता. तेव्हा योगेश पाटील हा ताफ्यासमोर आडवा झाला. त्याने हातात विषाची बाटली घेतली होती. विष प्राशन करणार तोच, पोलिसांनी धाव घेऊन त्याच्या हातातून विषाची बाटली हिसकावल्याने अनर्थ टळला. यावेळी शेतकरी योगेश पाटील याने राज्यात यापूर्वी भाजपचे सरकार असतानाही केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली होती. आता राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे तर अतिशय निष्क्रिय आहे. शेतकऱ्याला एक रुपयाची देखील आर्थिक मदत मिळणार नाही, असा संताप त्याने व्यक्त केला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज