fbpx

वैजनाथ वाळू गटाचे इनकॅमेरा मोजमाप करावे : ॲड. विजय पाटील

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२१ ।रंडोल तालुक्यातील वैजनाथ वाळू गटातून बेसुमार वाळूचा उपसा सुरू असल्यामुळे याठिकाणी मोठमोठे खड्डे पडत आहे. या खड्यांमुळे जिवीतहानी होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, या सर्व प्रकाराची चौकशी करण्यासाठी महसूल विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इन कॅमेरा मोजमाप करण्यात यावे, अश्या मागणीचे निवेदन ॲड. विजय भास्कर पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

काय म्हटले आहे निवेदनात?
वैजनाथ वाळू गट श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.तर्फे आदित्य खटोड यांनी निविदा भरून घेतलेला आहे. सदर निविदाधारकाकडून पोकलँडच्या सहाय्याने बेसुमार उपसा केला जात आहे. यामुळे नदीपात्रात २० ते २५ फुटाचे मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्याच्या दिवसात पाणी भरल्यानंतर खड्ड्यांचा अंदाज येत नाही. या परिसरातील नागरिक या ठिकाणावरून ये-जा करीत असतात. त्यामुळे भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता आहे.

निविदाधारकाकडून नियमबाह्य काम सुरू असून वाळू गटातून दररोज १०० ते १५० डंपरद्वारे वाळूची उचल केली जात आहे. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडाला असून १० ते १५ हजार ब्रास वाळू उपसा ठेकेदाराने केलेला आहे. या ठिकाणी केवळ एक हजार ४२८ ब्रासला मंजुरी असताना एवढा वाळू उपसा केला जात असून या ठेकेदारांवर कोणाचा वरदहस्त आहे, असा प्रश्न देखील ॲड. पाटील यांनी उपस्थित केला आहे.

आव्हाने, नारणे, बांभोरी वाळू गटातील उचल संपून संबंधित ठेके शासन जमा झाले आहे. मात्र वैजनाथ वाळू गटात अजूनही उचल सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज