भुसावळात कुत्र्याने तोडला बालकाच्या गालाचा लचका; ६ जणांना घेतला चावा

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२१ । नगरपालिकेकडून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात नसल्याने भुसावळ शहरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी हौदोस घातला आहे. शनिवारी एका दिवसात ५ बालकांसह एका ५५ वर्षीय वृद्धेस कुत्र्यांनी चावा घेतला. त्यापैकी एका बालकाच्या गालावर कुत्र्याने चावा घेतल्याने या बालकाला जळगाव येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

भुसावळ शहरातील विनायक कॉलनी, शिव कॉलनी परिसरातील करुणेश्वर मंदिर परिसरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. टोळक्याने हे कुत्रे फिरत असल्याने या भागातील नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. शनिवारी या भागातील रुद्र नीलेश पाटील (वय-३), धुर्वी प्रशांत नेहेते (वय-१०), विधी कुरकुरे (वय-२), वल्लभ निलेश सुरवाडे (वय-३), आलोक लोकेश वारके (वय-२) व लताबाई नामदेव वारुळकर (वय-५५) या सहा जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. यातील एका बालकाच्या गालाचा कुत्र्याने लचका तोडल्याने भूल देवून उपचार करावे लागणार होते. यामुळे त्यास तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. उर्वरित पाच जणांनी देखील शहरात उपचार न करता जळगाव येथील जिल्हा रुग्णालय गाठले.

पालिकेकडे यंत्रणाच नाही
भुसावळ शहरातील सर्वच भागांमध्ये मोकाट कुत्र्यांची समस्या वाढली आहे. त्यामुळे या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. मात्र पालिकेकडून याची कोणतीही दखल घेतली जात नाही. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठीची कोणतीही यंत्रणा पालिकेकडे नाही. यामुळे शहरात कुत्र्यांची संख्या वाढून हौदोस घातला आहे. अनेक भागात रस्त्यावरुन चालताना नागरिकांना आपला जीव मिठीत घेऊन ये-जा करावी लागत असते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज