१० दिवसांत ४२ हजार प्रवाशांना साडेतीन काेटी दंड

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२१। सणासुदीत रेल्वेमध्ये होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन विनातिकीट, आरक्षण तिकीट काढून एसीच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या ४३ हजार प्रवाशांवर रेल्वे विभागाकडून कारवाई करण्यात आली. अशा प्रवाशांकडून १० दिवसात तब्ब्ल ३ काेटी ६४ लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

दिवाळीचा सण नुकताच देशभरात साजरा करण्यात आला. दिवाळीत अनेक जण गावाकडे जात असतात. दिवाळीचा सण साजरा केल्यानंतर परतीचा प्रवास करणाऱ्यांचीही संख्या मोठी असते. त्यामुळे या काळात रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी होत असते. या गर्दीचा फायदा घेऊन अनेक प्रवासी विनातिकीट, स्लिपरचे आरक्षण तिकीट काढून एसीच्या डब्यातून प्रवास, लगेज तिकिट न काढता लगेज घेऊन जाणे, असे प्रकार करताना आढळून येतात. त्यामुळे रेल्वेचे उत्पन्न बुडते. दरम्यान, अशा फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी रेल्वे विभागाकडून विशेष पथक नियुक्त करण्यात आले हाेते.

तीन मार्गावर तिकीट तपासणी
या पथकाने भुसावळ ते नाशिक, भुसावळ ते खंडवा आणि बडनेरा या तीन मार्गावर तिकीट तपासणी केली. यात विनातिकीट प्रवास करणारे, स्लीपर काेचचे आरक्षण तिकीट काढून वातानुकुलीत डब्यातून प्रवास करणारे आणि साेबतच्या जास्तीच्या लगेजचे तिकीट न काढणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यात १ ते १० नोव्हेंबरदरम्यान ४२ हजार ८३८ प्रवाशांकडून ३ काेटी ६४ लाख ६३ हजार ३६ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. डीआरएम एस.एस. केडिया, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील, मंडळ प्रबंधक बी.अरूणकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज