मिशन वात्सल्य योजने’ची अंमलबजावणी प्रभावीपणे करा : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

बातमी शेअर करा
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । जिल्ह्यात मिशन वात्सल्य योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. प्रत्येक पात्र बालकाला तातडीने लाभ मिळवून द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.             

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘कोविड-19’ जिल्हास्तरीय कृती दल, बेटी बचाओ- बेटी पढाओ, महिला व बालकल्याण समितीचा आढावा जिल्हाधिकारी राऊत यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, कोविड- 19 मुळे एक किंवा दोन पालक गमावलेल्या बालकांच्या अडी- अडचणी समजून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. या बालकांना मिशन वात्सल्य योजनेचा लाभ मिळवून द्यावा. बेटी बचाव – बेटी पढाओ अभियानाची व्यापक जनजागृती करावी. या जनजागृतीचा भाग म्हणून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सप्ताह राबविण्यात यावा. तसेच रस्त्यावर भटकणाऱ्या अनाथ मुलांचे सर्वेक्षण करावे. बालकांच्या सर्वेक्षणासाठी शासकीय विभाग, सामाजिक संस्था, चाईल्ड लाईन, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी तात्काळ कार्यवाही करावी, अशाही त्यांनी सूचना केल्या.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. सोनगत यांनी जळगाव जिल्ह्यातील कोविड- 19 मुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या संदर्भात केलेल्या कामाची माहिती, बेटी बचाओ बेटी पढावो अभियानात केलेली जनजागृती याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच महिला बाल विकास विभाग व युनिसेफ अंतर्गत “सक्षम” उपक्रम व बाल विवाह निर्मूलन याबाबत नंदु जाधव, समन्वयक यांनी पॉवर पॉइंट द्वारे जिल्हा नियोजन आराखडा याचे सादरीकरण केले. या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, पोलीस विभाग,बाल विकास प्रकल्प अधिकारी व कर्मचारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी , सदस्य बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी कर्मचारी, चाईल्ड लाईन तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हे देखील वाचा :

      

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -