जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२२ । यावल येथील ग्रामीण रुग्णालयात शनिवारी क्षयरोग संदर्भातील लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रबोधन करण्यात आले. क्षयरोग पूर्णपणे बरा होतो, वेळीच तपासणी, उपचार करा असा सल्ला देताना आरोग्य विभागाकडून रुग्णांना दिली जाणारी मोफत औषधी आणि मानधनाबाबत माहिती देण्यात आली.
रुग्णांनी क्षयरोग संदर्भातील राज्य शासनाचे ॲप मोबाइलमध्ये डाउनलोड केल्यास उपयोगी ठरेल, अशी माहिती देण्यात आली. शनिवारी यावल येथील ग्रामीण रुग्णालयात क्षयरोग लक्षणे असलेल्यांची तपासणी व त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. रुग्णालयात विशेष कक्षात रुग्ण तपासणी झाली. या कक्षात तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हेमंत बऱ्हाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुका क्षयरोग समन्वयक नरेंद्र तायडे यांनी रुग्णांना क्षयरोग संदर्भातील उपचार पद्धती, शासनाकडून मिळणारे मानधन, क्षयरोगाची प्राथमिक लक्षणे, तपासणीनंतर रुग्णांची गोपनीय ठेवली जाणारी माहिती या संदर्भातील मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे रुग्णांना आरोग्य विभागाकडून कशा प्रकारे मोफत औषधोपचार, सकस आहार व आरोग्याची काळजी घेतली जाते, हे देखील सांगितले. रुग्णालयात दिवसभरात टप्प्याटप्प्याने रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले. क्षयरोग बरा होतो, आपण मनातील भीती काढून टाकावी. उपचारासाठी आरोग्य विभागात संपर्क साधावा असे, आवाहन देखील केले.