मी पुन्हा-पुन्हा निवडून येण्यासाठी स्ट्रगल करतो : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२१ । जोव्यक्ती ज्या क्षेत्रात उत्तम कार्य करतो तो माझ्या नजरेत त्या क्षेत्रातील आयएएस, आयपीएस  आहे. प्रत्येकाच्या यशामागे काहीतरी मेहनत आणि संघर्ष असतो. आमच्या क्षेत्रात देखील आहे. मी आज पालकमंत्री असलो तरी कधी मी देखील निवडणूक हरलो होतो. मी देखील पुन्हा पुन्हा निवडून कसा येईल यासाठी स्ट्रगल करतो, असे प्रतिपादन पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले.

दीपस्तंभ फाऊंडेशतर्फे युपीएससी आणि एमपीएससी परिक्षांमधील जिल्ह्यातील यशवंताच्या सत्कारासाठी ‘उत्सव यशाचा-सन्मान कर्तृत्वाचा’ या कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षीय भाषण करताना ते बोलत होते. प्रसंगी पिंपरी-चिंचवडचे आयुक्त राजेश पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे, आयआरएस विशाल यांच्यासह यशस्वी विद्यार्थी उपस्थित आहेत.

ना.गुलाबराव पाटील पुढे म्हणाले कि, मला १२ वीला ५६ टक्के मार्क होते. तेव्हा बीएडला सहज प्रवेश मिळू शकला असता पण कुटुंबात कुणी शिक्षित नसल्याने ते शक्य झाले नाही. अगोदर कुटुंब नियोजनबाबत नागरीक फारसे गंभीर नव्हते. कुटुंबात ३ बहिणी ४ भाऊ आणि गावात एकच शाळा, त्यात उत्पन्न कमी अशी परिस्थिती होती. आज दिवस बदलले आहे. मुलगा १२ वी पास झाला कि मोबाईल हातात आणि पदवी संपादन केल्यावर गाडी भेटते. पालक जागरूक झाले आहे. मला काही नसले तरी चालेल पण मुलांच्या शिक्षणात कमी पडू नये असे ते ठरवतात. माझा राजकारण हा भाग नव्हता पण तेव्हा पक्ष आला आणि जेलमध्ये गेलो. त्यानंतर राजकारणात पडलो, असे ते म्हणाले.

तुमचं ५८ ला संपते, आमचं ५८ ला सुरु होते

ना.गुलाबराव पाटील यांनी  सांगितले कि, संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. मी देखील पुन्हा पुन्हा कसा कसा निवडून येईल यासाठी स्ट्रगल करतो. शासकीय अधिकाऱ्यांचे काम ५८ ला संपते आणि आमचं ५८ ला सुरु होते. काही जण काठी टेकायला लागले तरी तिकीट मागतात. आज जिल्ह्यातील कुणी जिल्हाधिकारी झाला कि आम्हाला आनंद होतो, असे त्यांनी सांगितले. राजकारणात सुरुवात करताना चांगल्या माणसाची पारख करणे राजकरण्याचे काम असते. मला चांगले अधिकारी ही माझी श्रीमंती आहे, असे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज