मी त्या मरणाच्या दारातून परतलो- छगन भुजबळ

 

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२१।  ‘मला तुरुंगात टाकलं. प्रकृती खूप गंभीर झालेली. वाटलं सगळं संपलं, पण मी त्या मरणाच्या दारातून परतलो,’ अशी आठवण आज ओबीसी परिषदेमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सांगितली.

आजच्या परिषदेमध्ये जुने भुजबळ पुन्हा दिसले. भाषणा वेळी भुजबळांनी तुफान टोलेबाजी केली व समोर उपस्थित असलेल्या ओबीसी समाज बांधवांमध्ये हशा पसरला पर्यायाने टाळ्यांचा  कडकडाट झाला.

याच प्रसंगी भुजबळांनी तुरुंगातल्या दुखऱ्या क्षणांच्या आठवणीला हात घातला आणि आमदार कपिल पाटील यांनी आपल्याला कसं वाचवलं, ते सांगितलं. भुजबळ म्हणाले, ‘कपिल पाटलांनी माझा जीव वाचवला. मला जेलमध्ये टाकलेलं. एकदा प्रकृती खूप गंभीर झालेली. तिथं एक गोष्टी सोपी असते. कुणाला तरी जेलमध्ये टाकायचं. आजारी पडला की त्याच्याकडं बघायचंही नाही. एक दिवस हार्ट अटॅकनं गेला म्हणून सांगायचा. विषय तिथंच संपला. माझी प्रकृती बिघडलेली. हे कपिल पाटलांना कळलं. त्यांनी विधिमंडळात आवाज उठवला. ते म्हणाले, तुम्ही काय वागणूक देताय भुजबळांना. हॉस्पिटलमध्ये नेत नाही. नीट काळजी नाही. तिथं मारून टाकणार काय तुम्ही? त्यानंतर शरद पवारांनी पत्र पाठवलं. भुजबळांना काही झालं, तर हे सरकार जबाबदार राहील. अन् सुदैवानं मी बाहेर आलो.’

भाजपवर हल्लाबोल

जो जो या कामात येत नाही त्यांच्या मागे इन्कम टॅक्स लावली जाते, ईडी लावली जाते. जसे एकनाथ खडसे साहेबांच्या मागे लागले. म्हणून सर्वांनी सावध राहा आणि घाबरले असाल त्यांनी भाजपमध्ये जा. म्हणजे सर्व गुन्हे माफ होतील, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला. आज याठिकाणी सर्व जण अतिशय जोरात आणि तावातावात बोलले. उद्या इन्कम टॅक्स घरी आले नाही म्हणजे झालं.खडसेंनाही आज त्रास होतोय.सावध रहा बरं. जे घाबरले असतील त्यांनी भाजपमध्ये जावं. मग सब माफ होईल. भारत सरकारकडून अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात आहेत. धर्मांची अफूची गोळी आज सर्वांवर राज्य करत आहे. मंडल बाहेर आले की लगेच कमंडल बाहेर येतं, असं छगन भुजबळ म्हणाले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज