fbpx

पत्नी सोडून गेल्याने आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये दोघांचा उल्लेख

जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ मे २०२१ । पत्नी सोडून माहेरी गेल्याच्या तणावाखाली ३८ वर्षीय तरुणाने शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथे घडलीय. मृतदेहासोबत एक सुसाईड नोट आढळून आली असून त्यात गावातील दोन जण जबाबदार असल्याचे लिहिले आहे. भानुदास मंगल चौधरी (वय ३८) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

थोरगव्हाण येथील भानुदास मंगल चौधरी यांची पत्नी त्यांना सोडून निघून गेल्याने ते खूप निराश होते. रविवारी रात्री ते घरी परत आले नाही. यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. त्यात ते मनवेल रस्त्यावरील त्यांच्या स्वतःच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. यामुळे रात्रीच यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांचा मृतदेह यावल येथे आणण्यात आला. दरम्यान, त्यांच्या मृतदेहासोबत एक सुसाईड नोट होती, त्यात ‘माझी पत्नी मला सोडून निघून गेली आहे, याला गावातीलच दोन जण जबाबदार आहे. त्यांच्या त्रासामुळे मी आत्महत्या करत आहे’ असे नमूद आहे.

या सुसाईड नोटमध्ये संबंधितांचे नाव देखील अाहे. मात्र, तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी नाव गुप्त ठेवले आहे. पोलिस याबाबत तपास करणार असून पुढील कार्यवाही करतील. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी अतुल गोपाळ चौधरी यांच्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करत आहे. घटनेमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज