जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील पोहोरे येथील शेतकरी केशव राघो महाजन यांच्या घराला १९ फेब्रुवारी रोजी गॅस गळतीमुळे आग लागल्याने घरातील ७ लाख ७० हजारांची रोकड जळाली होती. त्यापैकी काही नोटा अर्धवट जळाल्या होत्या. त्या नोटा आ. मंगेश चव्हाण यांनी रिझर्व्ह बँकेत जमा केल्या होत्या. अखेर आमदार चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे रिझर्व्ह बँकेने अर्धवट जळालेल्या नोटांचा मोबदला म्हणून तीन लाख रुपये शेतकरी महाजन यांच्या खात्यात जमा केले आहे. त्यामुळे महाजन कुटुंबाला नक्कीच आधार मिळणार आहे.
शेतकरी केशव राघो महाजन यांनी नवीन घर घेण्यासाठी पैसे जमवले होते. तसेच कपाशी विक्रीतून आलेले सदर पैसे घरात ठेवले होते. २१ फेब्रुवारीला घराची खरेदी करायची होती, त्यापुर्वीच १९ फेब्रुवारीला त्यांच्या घराला आग लागली होती. या घटनेत महाजन कुटुंबाचे नवीन घर घेण्याचे स्वप्न भंगले होते. या कुटुंबाला माणुसकी दाखवत ग्रामस्थांनी सर्वतोपरी मदतीचा हात दिला होता. तसेच ग्रामस्थांनी वर्गणी जमा करून सव्वा लाख रुपयांची मदत केली होती.
तसेच आगीमुळे नुकसान झालेल्या घराची पाहणी करण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण आले असता, त्यांनीही केशव महाजन यांना रोख ५० हजार रुपयांची मदत केली होती. तसेच आगीत अर्धवट जळालेल्या नोटा बदलून आणण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. अखेर आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे रिझर्व्ह बँकेने अर्धवट जळालेल्या नोटांचा मोबदला म्हणून तीन लाख रुपये शेतकरी महाजन यांच्या खात्यात जमा केले.