fbpx

शेजाऱ्यांच्या दाराला कडी लावत चोरट्यांनी साधला डाव

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । वसीम खान । शहरातील तांबापुरा परिसरात असलेल्या फुकटपुरा भागात चोरट्यांनी डल्ला मारून दीड लाखाचा ऐवज लंपास करायची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी आजूबाजूच्या घरांना बाहेरून कडी लावून आपला डाव साधला.

पंचशील नगरात राहणारे सरफराज खान अयुब खान व त्यांचा मुलगा दोन्ही खाजगी वाहन चालक म्हणून काम करतात. सोमवारी रात्री त्यांचा मुलगा बाहेरगावी गेलेला होता. रात्री १० च्या सुमारास खान कुटुंबीय खालील घराला कुलूप लावून वरील माळ्यावर झोपण्यास गेले.

रात्रीच्या वेळी चोरट्यांनी खान यांच्या वरील खोलीला आणि शेजारी राहणाऱ्या इतर घराला बाहेरून कडी लावली. खान यांच्या घराचा कडी कोंडा तोडत कपाट फोडून १५ ग्रॅम सोन्याची पोत, चांदीचे कडे, चांदीची पोत, चांदीची अंगठी, १२ हजार रोख असा दीड ते दोन लाखांचा ऐवज लंपास केला.

मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास सरफराज खान हे उठले असता दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी शेजाऱ्यांची संपर्क साधला. शेजाऱ्यांचा देखील दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी परिसरातील इतर काही नागरिकांना संपर्क करून बोलावले. खान कुटुंबीय खाली आल्यानंतर घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात तक्रार नोंद करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज