fbpx

जळगाव शहरातील प्रतिष्ठित हॉटेलचा बेजबाबदारपणा

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२१ । शहरातील रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या हॉटेल सिल्व्हर पॅलेसमध्ये शनिवारी दुपारी बसलेल्या काही व्यवसायिक व उच्चशिक्षित तरुणांशी शेजारी टेबलावर बसलेल्या तरुणांनी विनाकारण वाद घालून धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. दरम्यान, याप्रकरणी हॉटेल व्यवस्थापनाकडून संबंधित तरुणांवर कोणतीही कारवाई न करण्यात आल्याने ग्राहकांच्या सुरक्षेचे आणि आदरतिथ्याचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या हॉटेल सिल्वर पॅलेसमध्ये शनिवारी पाचोरा जळगाव येथील काही उच्चभ्रू तरुण व्यवसायिक हे मित्रांसमवेत जेवणासाठी बसलेले होते. हॉटेलमध्ये त्यांच्या शेजारील टेबलवर बसलेल्या चार तरुणांपैकी अभय भंगाळे या तरुणाला अति मद्यप्राशन केल्याने ओकारी होत होत्या. किळसवाण्या प्रकाराला पाहून पाचोरा, जळगावचे तरुण काहीसे बाजूला झाले असता त्याचा राग आल्याने अभय भंगाळे व अक्षय आळंदे या तरुणांनी त्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका तरुणाने खुर्ची देखील मागे फेकली.

सर्व प्रकार घडत असताना हॉटेल व्यवस्थापनाकडून संबंधित तरुणावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही किंवा त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा देखील दाखल करण्यात आला नाही. हॉटेलमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार कैद झाला आहे. मद्यप्राशन करीत असलेला तरुण अभय भंगाळे हा मी हॉटेल मालक असल्याचे सांगत असल्याने तरुणांनी वाद टाळला. हॉटेल व्यवस्थापनाकडून त्याच्या विनवण्या करण्यात येत होत्या. शहरातील एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये होत असलेल्या या प्रकाराबाबत व्यवस्थापक किंवा मालक प्रशासन कोणतीही ठोस भूमिका होत नसल्यास घेत नसल्याने ग्राहकांच्या आदरतिथ्य सुरक्षेचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संबंधित उच्च व्यवसायिक तरुण याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते परंतु अभय भंगाळे याच्यासोबत असलेले काही जण मध्यस्थी करण्यासाठी व क्षमा मागण्यासाठी आले. यावेळी तक्रारदाराची मनस्थिती चांगली नसल्याने आणि आपल्यावर दबाव आणला जात असल्याचे वाटल्याने त्याने तक्रार दाखल केली नाही. अभय भंगाळे याच्यावर यापूर्वी देखील काही गुन्हे दाखल होते असे समजते.

आपल्या हॉटेलची प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी व्यवस्थापन व मालकांकडून काय भूमिका घेण्यात येते याकडे लक्ष लागून आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज