पालकमंत्र्यांच्या विरोधातील कुंडली आ.किशोर पाटलांच्या हाती!

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२१ । जिल्ह्यात पंचायत राज समितीचा दौरा असून जिल्ह्यातील तक्रारींवर ठोस कारवाई होत नसल्याने समितीचे सदस्य आ.किशोर पाटील यांना जळगाव जागृत मंचतर्फे तक्रार सोडविण्यासाठी साकडे घालण्यात आले. इतकंच नव्हे तर पालकमंत्री ना.गुलाबराब पाटील यांच्या मतदार संघातील विषय, जिल्हा रुग्णालयातील अपहार प्रकरण व इतर अनेक तक्रारींची कुंडली आ. किशोर पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

जिल्ह्यात अनेकांच्या तक्रारी येत आहेतच पण आतापर्यंत घेतलेल्या तक्रारीवर कोणतीच कारवाई झाली नाही म्हणून लोकांचा विश्वास राहिलेला नाही. तरीही पंचायत राज समितीमध्ये आमदार किशोर पाटील त्या समीतीत असल्याने थोडा विश्वास वाढला असल्याचे जळगाव जिल्हा जागृत जनमंचने म्हटले आहे.

सोमवारी सकाळी तासभर एका हॉटेलमध्ये जळगाव जिल्हा जागृत जनमंचची बैठक झाली. त्या ठिकाणी आमदार किशोर पाटील यांना विशेष आमंत्रण देऊन बोलवण्यात आले. शिवराम पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील अनेक तक्रारी आमदारांनी स्विकारल्या, समजून घेतल्या आणि निरसन करण्याची जबाबदारी घेतली.

जळगाव जागृत मंचने दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील नांदेड येथे घरकुलसाठी कलेक्टरने जमीन देऊन आठ महिने झाले. तरीही धरणगावचे बीडीओ स्नेहा कुडचे यांनी लेआऊट बनवून लाभार्थ्यांना प्लॉट दिले नाहीत. पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या मतदारसंघातील हे प्रकरण असूनही गरीबांना घरकुल देण्यात गुलाबराव पाटील मदत करीत नाहीत. त्यामुळे गुलाबराव पाटलांच्या कार्यपद्धतीवर शंका घेतली जात आहे. म्हणून मुद्दाम शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचेकडे तक्रार करण्यात आली.

जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर व कॉन्सेन्ट्रेटर खरेदीमध्ये साडेतीन कोटीचा अपहार उघड झाला. तेथेही पालकमंत्री जबाबदार असल्याने हे प्रकरण मुद्दाम शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचेकडे सोपवले. शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी डीपीडीसी मिटींगमध्ये हरकत घेतल्याने गुलाबराव पाटील नाराज झालेत. त्यांना घरचा आहेर मिळाल्याने त्यांच्यावर संशयास्पद अंगुलीनिर्देश होत आहे. पालकमंत्री डिपीडिसीचा अध्यक्ष असतो. डिपीडिसीच्या निधीतून व्हेंटिलेटर व कॉन्सेन्ट्रेटर खरेदी केले म्हणून पालकमंत्री अडचणीत येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. पालकमंत्री हेच संशयाच्या घेऱ्यात येत असल्याने पंचायत राज समीती त्यांच्या विरोधात तक्रार घेतील का? घेतली तर कारवाई करतील का? याबाबत जळगाव जागृत मंचने शंका उपस्थित केली आहे.

पारोळा तालुक्यातील मुंदडा येथे २०१७ मध्ये २ लाख रुपयांचा अपहार सरपंच व ग्रामसेवक यांनी केला. चौकशीतून आरोप सिद्ध झाला. गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीईओने बीडीओला दिले. तरीही कारवाई झाली नाही. याचीही तक्रार आमदार किशोर पाटलांना देण्यात आली. पाचोरा तालुक्यातील आरटीई शाळांसाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकार व राज्य सरकारकडून जळगाव जिल्हा परिषदेत आलेले आहे. शिक्षणाधिकारी अडवणुक करीत आहेत. तशी तक्रार आमदार किशोर पाटील यांचेकडे देण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद ठप्प झालेली आहे म्हणून झेडपी कर्मचाऱ्यांकडून वर्गणी जमा करून पंचायत राज समीतीला खुष करण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. याची तक्रार आमदार किशोर पाटील यांच्याकडे करण्यात आली.

जळगाव जिल्हा जागृत जनमंचतर्फे आ.किशोर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. जळगाव जिल्ह्याचे नेतृत्व आपण स्विकारावे अशी गळ त्यांना घालण्यात आली. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आ.किशोर पाटलांची नेमणूक करावी, त्यांना आमदार ग्रामविकास खाते सोपवण्यात यावे, अशी मागणी जळगाव जिल्हा जागृत जनमंच करणार आहे. ग्रामविकासमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्यावर इडीची कारवाई होऊ शकते. त्यांचे मंत्रीपद जाऊ शकते.म्हणून ते खाते आमदार किशोर पाटील यांचेकडे सोपवले जावे. अशी जिल्ह्यातील नागरिकांची मागणी असल्याचे जळगाव जागृत मंचने म्हटले आहे.

बैठकीला सुरज पांडे, डॉ.सुभाष राणे, ईश्वर मोरे, दिपककुमार गुप्ता, अनिल नाटेकर, अमोल कोल्हे, राकेश वाघ,प्रफुल्ल पाटील, गुरूनाथ सैंदाणे, निलकंठ पाटील, प्रेम शामलानी व त्यांचे सहकारी हजर होते. विवेक ठाकरे यांनी देखील आ.किशोर पाटील यांचा सत्कार करून तक्रार सोपवली. ईश्वर मोरे यांनी आभारप्रदर्शन केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज