हिंदीची सशक्त वैश्विक भाषेकडे वाटचाल – डॉ.सुभाष महाले, निवृत्त प्राचार्य

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२२ । हिंदी भाषेत प्रेम आणि सौहार्द भाव वसलेला आहे. तिच्यात इतर भाषेतील शब्दांना सहज स्वीकारण्याची क्षमता आहे. त्यामुळे भाषिक विकास नियमानुसार ती अधिक व्यापक आहे. राष्ट्र्भाषेकडून विश्वभाषेकडे हिंदीचा झालेला प्रवास थक्क करणारा आहे. विश्वभर पसरलेल्या भारतीय लोकांनी आपल्या संस्कृतीच्या अभिव्यक्ती साठी हिंदी भाषेला माध्यम बनविले. त्यामुळे हिंदीचा जगभर प्रचार-प्रसार झाला. खानदेश सुपूत्र लोकसेवक स्व.मधुकरराव चौधरी यांनी हिंदी प्रचार समिति, वर्धाच्या अध्यक्षपदी असतांना भारतात पहिले विश्व हिंदी संमेलन १९७५ ला नागपूर येथे आयोजित केले. तेव्हापासून हिंदीला विश्व स्तरावरील भाषा बनविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.यातून आपल्या विश्वबंधुत्व मूल्याची रुजवणूक साकार होणार यात शंका नाही.कारण भाषा ही जोडण्याचे काम करते, ती मैत्रीचा सेतू असते.आणि हिंदी भाषेत ती संभावना विद्यमान आहे. असे मत मू.जे.तील भाषा प्रशाळेच्या हिंदी विभाग आणि साहित्य, कला व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने विश्व हिंदी दिनानिमित्त ऑनलाईन पद्धतीने आयोजित कार्यक्रमात हिंदीचे विद्वान आणि शहादा येथील कला आणि विज्ञान महिला महाविद्यालायचे निवृत्त प्राचार्य डॉ.सुभाष महाले यांनी व्यक्त केले.

आपल्या व्याख्यानात प्रा. महाले पुढे म्हणाले की २००६ पासून विश्व हिंदी दिन भारत आणि भारताबाहेर सुमारे २१५ देशामध्ये साजरा करण्यात येतो. हिंदी भारताबाहेर १८० देशांमधील विद्यापीठांमध्ये शिकवली जाते. आणि संख्येच्या दृष्टीकोनातून जगात द्वितीय क्रमांकाची भाषा आहे. या भाषेचा भारतात राजभाषा व संपर्कभाषा म्हणून प्रयोग केला जातो. तिच्या सन्मानासाठी हा विश्व हिंदी दिन साजरा केला जातो. आज जागतिकीकरणाच्या आणि उदारीकारणाच्या काळात जगाला जर आपल्या उत्पादनाला भारतात विकायचे असेल तर जगाला हिंदी भाषेशिवाय पर्याय नाही. तसेच हिंदी भाषेच्या साहित्यामधून मानवी जीवन मूल्यांचा प्रचार–प्रसार करण्यात आला. हिंदी भाषेमध्ये सुलभता हा गुण आहे, म्हणून हिंदी भाषा जनसामान्यांनी मनात साठवलेली भाषा आहे. आज ती विश्वस्तरावर मान्य भाषा होण्याच्या मार्गावर आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले भाषा प्रशाळेचे संचालक डॉ.भूपेंद्र केसुर यांनी ही ‘हिंदी तील भाषिक व साहित्यिक बलस्थाने विशद केली आणि वर्तमान संदर्भातील हिंदीच्या महत्वावर प्रकाश टाकला. त्याच प्रमाणे मू.जे.च्या कलाकार विद्यार्थ्यांनी विश्व हिंदी दिनानिमित्त निर्मित केलेल्या विविधता में एकता या पथनाट्याचे आभासी मंचावरून प्रसारण करण्यात आले. एकूण 10 विद्यार्थ्यांनी सदर पथनाट्यामध्ये सकस भूमिका साकारली आहे. हिंदी विभागातील प्रा.विजय लोहार यांनी सूत्र संचालन केले. हिंदी विभाग प्रमुख डॉ.रोशनी पवार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला साहित्य, कला व सांस्कृतिक मंडळ प्रमुख डॉ.भाग्यश्री भलवतकर आणि हिंदी विभागाचे डॉ.मनोज महाजन यांचे अनमोल सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा :

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -