कन्नड घाटमधून होणारी ‘अवजड वाहतूक’ अखेर बंद

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२१ । कन्नड घाटमध्ये सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे घाटातील होणारी अवजड वाहतूक दि.१७ ते २७ नोव्हेंबर दरम्यान बंद करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून घेण्यात आला आहे. दुचाकी व हलक्या वाहनांना मात्र मुभा राहणार आहे.

दि.३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे कन्नड घाटात जागोजागी दरड कोसळल्याने महामार्ग खचला होता. त्यामुळे घाट वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला होता व वाहतुक अन्यत्र मार्गाने वळविण्यात आली होती. त्यानंतर या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करून दि.१५ सप्टेंबर रोजी दुचाकी व हलक्या वाहनांसाठी व त्यानंतर दि.९ नोव्हेंबर रोजी अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी हा घाट खुला करण्यात आला होता.

दुरुस्तीच्या कामामुळे वाहतूक कोंडी
घाट अवजड वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, मात्र काही ठिकाणी संरक्षण भिंत उभारणी व रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू होते. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. तब्बल २१ तासांपर्यंत ही कोंडी होती. सतत होणाऱ्या कोंडीमुळे वाहनधारकांसह पोलीस प्रशासनाचीही चांगलीच दमछाक झाली होती. घाटात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे घाटातून होणारी अवजड वाहतूक बंद करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह नागरिकांकडून होत होती. त्यानंतर चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशन व महामार्ग पोलीस केंद्राकडूनही याबाबत पत्रव्यवहार करून अवजड वाहनांसाठी घाट खुला केल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन पुर्ण दिवस रात्र वाहतुक जाम होत आहे, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास कळविण्यात आले होते व दुरुस्तीचे काम पुर्ण होईपर्यंत अवजड वाहनांस बंदी घालावी अशी मागणी केली होती. मे संत सतरामदास प्रा. लि. या कंत्राटदार कंपनीने देखील याबाबत पत्रव्यवहार केला होता.

नांदगावमार्गे वळविली वाहतूक
कन्नड घाटातून होणारी अवजड वाहतूक दि.१७ नोव्हेंबरच्या सकाळी ८ ते दि.२७ नोव्हेंबर रोजी रात्री १२ पर्यन्त बंद करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले आहेत. यादरम्यान, औरंगाबादकडून धुळेकडे येणारी व जाणारी अवजड वाहतुक औरंगाबाद-देवगाव रंगारी-शिऊर बंगला-नांदगाव-मालेगांवमार्गे तर औरंगाबादकडून चाळीसगांवकडे येणारी व जाणारी वाहतुक औरंगाबाद-देवगांव रंगारी-शिऊर बंगला-नांदगावमार्गे वळविण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज