डोळ्यातून तरळले अश्रू जेव्हा हृदयाला भिडले ‘माझा भाऊराया’

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । भाऊ-बहिणीचे नातंच असे आहे कि ज्याठिकाणी बहिणीची वेडी माया आणि भावाचे निर्मळ प्रेम अनुभवता येते. दोघांमध्ये कितीही वाद असो मात्र त्यांचे एकमेकांवर असलेले प्रेम ते लपवूच शकत नाही. जळगावातील काही हौशी तरुण-तरुणींनी एकत्र येत साकारलेले ‘माझा भाऊराया’ हे गाणे नुकतेच युट्युबवर रिलीज करण्यात आले. आपल्या दिव्यांग भावासाठी राखी खरेदी करण्यासाठी चिमुकल्या बहिणीची सुरु असलेली धडपड, समाजाने तिला दिलेली तिरस्काराची वागणूक, एका तरुणाने केलेले सहकार्य आणि त्यानंतर भावाला राखी बांधल्यावर त्याच्या डोळ्यातून तराळलेले अश्रू पाहून आपल्या देखील डोळ्यात अश्रू येतात. हृदयाच्या प्रत्येक कोपऱ्याला स्पर्श करणाऱ्या ‘माझा भाऊराया’ ची सोशल मीडियात चांगली चर्चा आहे.

कोणताही सण, उत्सव असो त्यामागे काहीतरी कारण आणि सामाजिकतेचा किंवा धार्मिकतेचा संदेश लपलेला आहे. नुकतेच झालेले रक्षाबंधन देखील भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे नातं दर्शविते. बहीण भावाकडून राखी बांधून घेत असताना त्याच्याकडून स्वतःच्या सुरक्षेचे वचन देखील घेत असते.

दोन्ही हातांनी दिव्यांग असलेल्या भावाकडून सुरक्षेचे वचन न घेता त्याला राखी बांधण्यासाठी स्वतःच्या कलाकारीतून साकारलेली पेंटिंग बाजारात वणवण फिरत विक्री करणाऱ्या चिमुकलीच्या धडपडीचे महत्व आणि भावनिक संदेश देण्यासाठी जळगाव शहरातील भाग्यदिप म्युझिक व बंधन प्रॉडक्शनतर्फे “माझा भाऊराया’ हे युट्युब गाणे नुकतेच सादर करण्यात आले आहे.

जळगावात झाले चित्रीकरण, स्थानिक कलावंतांचे सहकार्य

माझा भाऊराया या गाण्याचे लेखन व गायन कुणाल पवार यांने केलेले आहे. सह गायिका म्हणून सिद्धी बघे यांची साथ आहे. दिगदर्शन प्रदीप भोई यांनी केले आहे तर योगेश ठाकूर यांनी चित्रीकरण केले आहे. या गाण्यात लहान मुलीची भूमिका साधना ठाकूरने साकारली. भावाची भूमिका डार्लिंग चित्रपटातील अभिनेता परीक्षित लंगडे याने साकारली.

डी.जे.प्रमोद यांचे संगीत साहाय्य असून विभावरी मोराणकर, अक्षय राजपूत,गौरव मोरे, सौभाग्य सेनापती, रिया चित्ते, भानुदास जोशी, संदीप मोरे, इम्रान बिस्मिल्ला, प्रवीण लाड, प्रांजळ पंडित, विवेक शिंपी, हर्षदा पाटील, स्नेहल बोन्डे, नेहा भागनानी यांचे देखील सहकार्य लाभले आहे. चित्रकरण हे जळगाव शहरातच झाले असून सर्व कलाकार हे खान्देशातील आहेत.

आठवडाभरात १४ हजारांपेक्षा अधिक व्ह्यूज 

खान्देशातील कलाकारांनी तयार केलेल्या या गाण्याला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर दाद मिळत आहे. अवघ्या आठवडाभरात गाण्याला १४ हजाराहून अधिक व्ह्यूज तर सुमारे दीड हजाराहून अधिक लाइक्स मिळाले आहे. प्रत्येक जळगावकरांनी एकदा तरी हे हृदयस्पर्शी गाणे पाहावे आणि आपल्या सभोवताली असणाऱ्या गरजूंच्या नेमक्या अडचणी काय असतील याचा अंदाज घेत त्यांनी भीक नको पण त्यांचा स्वाभिमान दुखावणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar