वाळूमाफियांची दहशत : महसूलच्या पथकासमोरच उडी मारत काढला पळ

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२१ । निमखेडी शिवारातील गिरणा नदीपात्रात महसूलचे पथक समाेर दिसताच वाळूतस्करी करणाऱ्या चालकाने धावत्या ट्रॅक्टरवरून उडी मारून पळ काढला. पुढे जाऊन हे ट्रॅक्टर कलंडले. सुदैवाने ताे ट्रॅक्टरखाली न आल्याने त्याचा जीव वाचला. हा थरार बुधवारी सकाळी ८.३० वाजता घडला. या प्रकरणी तहसीलदार सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ‘त्या’ अज्ञात ट्रॅक्टरचालकाविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

नायब तहसीलदार विशाल नगराज सोनवणे (वय ३६, रा. शिवरामनगर) हे पथकासह वाळूचोरी रोखण्यासाठी गिरणा नदीपात्रात गस्त घालत होते. त्यांना एमएच १९ सीव्ही ३६३४ क्रमांकाचे एक ट्रॅक्टर वाळूचोरी करताना दिसून आले. या पथकाने चालकास थांबवण्याच्या सूचना केल्या; परंतु त्याने पथकाच्या सूचना धुडकावत पळून जाण्याचा प्रयत्न केला. नदीपात्रात अवैध वाळू वाहतुकीमुळे पडलेल्या खड्ड्यांतून वेगात ट्रॅक्टर पळवून नेण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचे ट्रॅक्टर कलंडले. ट्रॉली कलंडल्यानंतर सुमारे दीड ब्रास वाळू पुन्हा नदीपात्रात सांडली. ट्रॅक्टर कलंडत असताना सुदैवाने चालकाने बाजूला उडी घेतल्याने तो बचावला. अन्यथा मोठी अप्रिय घटना घडली असती. उडी मारल्यानंतर चालक नदीपात्रातून पळून गेला. यानंतर पथकाने कलंडलेले ट्रॅक्टर, ट्रॉली जप्त केली. नदीपात्रात सांडलेल्या वाळूचा पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ‘त्या’ अज्ञात ट्रॅक्टरचालकाविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अनिल फेगडे तपास करीत आहेत.

वाळूमाफियांच्या जीवघेण्या, मुजोरी दाखवणाऱ्या घटना

१ ) गेल्या महिन्यात शिव कॉलनी स्टॉपवर महसूलचे पथक पाठलाग करीत असलेल्याा ट्रॅक्टरचालकाने धावत्या ट्रॅक्टरवरून उडी घेत पळ काढला होता. यानंतर हे ट्रॅक्टर सुमारे ३० मीटर अंतर पुढे येऊन एक रिक्षेस धडकले हाेते. सुदैवाने रिक्षेत कुणीही नसल्याचे अप्रिय घटना घडली नाही.
२) भडगाव तालुक्यातील शिंदी येथील तलाठी शिवाजी कौतिक पारधी (वय ५२) व त्यांचे सहकारी राजेंद्र थोरात यांनी अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर अडवले हाेते. समाधान युवराज पाटील, अजय रवींद्र मोरे व संजय सुरेश त्रिभुवन या माफियांनी पारधी यांच्यावर हल्ला चढवत छातीत बुक्के मारले. मोबाइल हिसकावून घेत दगडाने ठेचला. दुचाकीवर मोठे दगड मारून नुकसान केले.
३) कासोदा पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी एरंडोल तालुक्यात एमएच २० सीटी ९२८४ हे डंपर अडवले. त्यात तीन ब्रास वाळू होती. डंपरचालक गगन छगन तडवी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असतानाच तडवीचा सहकारी अमीन हुसेन शेख याने मुजोरी दाखवत थेट पोलिस ठाण्यातून डंपर पळवून नेला हाेता.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -