मेहरुणमध्ये हरिनाम कीर्तन सप्ताह, भागवत कथेचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२१ । जळगाव येथील मेहरुण भागामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा प्रित्यर्थ अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा श्रीमद भागवत कथेचे आयोजन दि.२५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. सप्ताहाचे यंदाचे २१ वे वर्षे असून जळगाववासियांनी या किर्तन सप्ताह तथा भागवत कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केले आहे.

जीवनात सर्वत्र चैतन्य यावे, दु:खी कष्टी वाटणार्‍या मनाचा कीर्तन व प्रवचन श्रवणाने अध्यात्मिक विकास होऊन मनातील दुर्बलता नष्ट व्हावी यासाठी हरिनाम कीर्तन सप्ताह तथा संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक तथा महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य प्रशांत नाईक यांनी दिली. हरिनाम संकीर्तन सप्ताह उत्सवाचा प्रारंभ २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. दररोज सकाळी ५ ते ६ या वेळेत काकड आरती, दुपारी १ ते ४ संगीतमय भागवत कथा, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व रात्री ८ ते १० हरी कीर्तन होणार आहे.

सप्ताहाच्या पहिल्या दिवशी श्रीमद् भागवत ग्रंथ पुजन माजी महापौर नितीन लढढा आणि माजी नगरसेविका अलका लढढा यांच्या हस्ते होणार आहे. श्रीमद् भागवत कथा सुरवाडा येथील तुकाराम महाराज देवस्थान येथील ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर हे सांगणार असून २ डिसेंबर रोजी रात्री काल्याचे किर्तन देखील तेच करणार आहे. दि.२५ रोजी जामनेर येथील मंगलाताई महाराज, दि.२६ रोजी कैली येथील जीवन महाराज, दि.२७ रोजी तळवेल येथील किशोर महाराज, दि.२८ रोजी गोजेरा येथील शरद महाराज, दि.२९ रोजी शेंदुर्णी येथील कन्हैया महाराज, दि.३० रोजी धामणगाव बढे येथील सदानंद महाराज व दि.१ डिसेंबर रोजी बेटावद खुर्द येथील अमृत महाराज गाडे यांचे कीर्तन होणार आहे.

सप्ताहाची सांगता २ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत होणार आहे. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, उद्योजक अशोक जैन, शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे, महापौर जयश्री महाजन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्यासह आमदार, खासदार व महापालिकेतील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता श्रीमद् भागवत कथेची दिंडी मिरवणूक काढण्यात येणार असून मिरवणुकीनंतर भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. सप्ताहच्या यशस्वीतेसाठी श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ, श्रीराम तरुण मित्र मंडळ, नवजीवन मित्र मंडळ, जय जवान मित्र मंडळ, जय दुर्गा ग्रुप, साई दत्त ग्रुप, वंजारी युवा संघटना, श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे कर्मचारी व मेहरुणचे ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज