fbpx

…म्हणून नारायण राणेंचे डोकं सूक्ष्म झालं : मंत्री गुलाबराव पाटलांची टीका

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२१ । नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेत नाराज असल्याचा दावा करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सडकून टीका केली आहे. नारायण राणे यांना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं आहे, त्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं आहे. त्यामुळेच ते एकनाथ शिंदे शिवसेनेवर नाराज असल्याचं म्हणत आहे, अशी जोरदार टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

काय म्हणाले होते राणे?

‘एकनाथ शिंदे हे केवळ सहीपुरते मंत्री आहेत. त्यांना निर्णयाचं स्वातंत्र्य नाही. त्यांच्या खात्यात मुख्यमंत्र्यांचा व ‘मातोश्री’चा हस्तक्षेप असतो. त्यामुळं शिंदे कंटाळले आहेत. ते मार्गाच्या शोधात आहेत,’ असं राणे यांनी म्हटलं होतं.

याबाबत गुलाबराव पाटील यांना विचारण्यात आलं असता त्यांनी राणेंवर सडकून टीका केली. “नारायण राणे पहिले किती दिवस अस्वस्थ होते हे आपण पाहिले आहे. त्यामुळे त्यांचा अस्वस्थपणा आता निघाला आहे. आधी ते शिवसेनेत अस्वस्थ होते. मग ते काँग्रेसमध्ये अस्वस्थ झाले आणि आता भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना सूक्ष्म लघू उद्योग खातं मिळालं. त्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं आहे”, असा खरमरीत टोला गुलाबराव यांनी राणेंना लगावला आहे.

“एकनाथ शिंदे हे शिवसेना नेते आनंद दिघे यांचे चेले आहेत. ठाणे येथे शिवसेनेचा झेंडा तेवत ठेवला त्यांचे शिंदे हे चेले आहेत. त्यामुळे नारायण राणे यांचा शिंदेंबाबतच अंदाज हा हवामान खात्याप्रमाणे चुकीचा ठरणारा आहे”, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज