बिग ब्रेकिंग : गुलाबराव देवकरांचा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत संचालक म्हणून निवडून आलेले माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना घरकुल प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली असून त्यांना निवडणूक लढविण्यास मज्जाव करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. शुक्रवारी न्यायालयाने याबाबत निकाल देताना याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे देवकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत गुलाबराव देवकर यांचे नाव आघाडीवर असून न्यायालयाच्या निकालाने त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

घरकुल घोटाळा प्रकरणी पाच वर्ष माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना शिक्षा झाली असल्याने, जिल्हा बँक निवडणूक लढवण्यास त्यांना मज्जाव केला जावा, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि शिक्षण सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. तसेच याबाबत पवन ठाकूर यांनीही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. याचिकेवर यापूर्वी दोन वेळा सुनावणी झाली होती. सुनावणी लांबल्याने देवकर यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आणि ते विजयी देखील झाले.

सर्वोच्च न्यायालयाचे न्या.नागेश्वर राव आणि न्या.गवई यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला आहे. गुलाबराव देवकर यांच्यातर्फे जेष्ठ विधिज्ञ ऍड.मुकुल रोहतगी, ऍड. अनिकेत निकम यांनी प्रभावीपणे युक्तिवाद केला. त्यांनी मांडले की, न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्याचा या प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नसल्याने ही याचिका खारीज करण्याची मागणी त्यांनी केली होती. ऍड.सुधांशु, ऍड.महेश देशमुख यांनी देखील यावेळी सहकार्य केले.

गुलाबराव देवकर यांना जळगाव येथील बहुचर्चीत घरकूल घोटाळ्यात न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. त्यामध्ये ३१ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना पाच वर्षे शिक्षा आणि पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलतर्फे मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. बँकेच्या अध्यक्षपदासाठी त्यांचा दावा मजबूत मानला जात असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने त्याला अधिक बळ मिळणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज