fbpx

पालकमंत्र्यांच्या मदतीने भारावले तृतीयपंथीय

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२१ । कोरोनामुळे तृतीयपंथियांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली असल्याची दखल घेत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने आज या समुदायातील सदस्यांना जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. या मदतीने अतिशय उपेक्षित अशा या समुदायातील मंडळी अक्षरश: भारावली. ना. पाटील यांनी आमचे पालकत्व घेतल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

याबाबत वृत्त असे की, कोरोनामुळे सध्या कडक निर्बंध सुरू असून यामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आलेली आहे. यातच समाजाच्या मदतीवरच उपजिवीका अवलंबून असणार्‍या तृतीयपंथी समाजावर तर अक्षरश: उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांच्यासाठी सध्याचे दिवस हे अतिशय खडतर असून आशेचा कोणताही किरण दिसून येत नाहीय. अशा विपरीत वातावरणात हभप गजानन महाराज वरसाडेकर यांनी या समुदायाची व्यथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या कानावर टाकली. याची दखल घेत पालकमंत्र्यांनी तातडीने या समुदायातील सदस्यांसाठी जीवनावश्यक किटची व्यवस्था केली. आज अजिंठा विश्रामगृहात तृतीयपंथी समुदायातील सदस्यांना या किटचे वाटप करण्यात आले.

mi advt

याबाबत मनोगत व्यक्त करतांना पालकमंत्री म्हणाले की, तृतीयपंथी समाज हा आधीच उपेक्षित असून सध्या लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर आपत्ती आल्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. ही मदत फार काही मोठी नसली तरी त्यांच्यासाठी काही दिवसांपर्यंत ती पुरणार आहे. आपण याला मदत मानत नसून ते आपल्या घरातीलच सदस्य असल्याने हे घरच्या मंडळीला केलेले सहकार्य आहे.

दरम्यान, तृतीयपंथियांच्या मदतीने या समुदायासाठी काम करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या शमिभा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, पालकमंत्र्यांनी केलेली मदत ही आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. ना. गुलाबराव पाटील यांनी या माध्यमातून आमचे पालकत्व स्वीकारले असल्याचे भावपूर्ण उदगार त्यांनी याप्रसंगी काढले.

या छोटेखानी कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर, नगरसेवक मनोज चौधरी, डीपीसी सदस्य श्याम कोगटा, सा.बा.चे सहाय्यक अभियंता सुभाष राऊत यांची उपस्थिती होती.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज