जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा, शासनाने काढले आदेश

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२१ । महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या कार्यात अधिकारी व्यस्त असल्याने आणि कोरोनाच्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणुका ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत स्थगित करण्यात आल्या होत्या. सोमवारी शासनाने आदेश जारी केले असून निवडणूक संदर्भातील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शासन आदेशात म्हटले आहे की, शासनामार्फत शेतकऱ्यांच्या कर्ज माफीसाठी “महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९” ही योजना राबविण्यात आली होती. कर्जमुक्ती योजनेची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी सहकार विभागाचे जिल्हास्तरिय क्षेत्रिय अधिकारी, जिल्हा अधिकारी व त्यांचे क्षेत्रिय अधिकारी यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असून, सहकार विभागातील बहुतांश अधिकारी योजनेच्या अंमलबजावणीच्या कामामध्ये व्यस्त असल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व प्राथमिक कृषि सहकारी पतसंस्था यांच्या निवडणूका तीन महिन्यासाठी स्थगित करण्यात आल्या होत्या.

महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणुक नियम २०१४ चा नियम ६ ते ११ मधील तरतुदीनुसार तात्पुरती मतदार यादी तयार करणे, त्यासंदर्भात आक्षेप मागविणे तसेच त्याबाबत सुनावण्या घेवून मतदार यादी अंतिम करण्यापर्यंतचा कालावधी पंचवीस दिवस इतका असतो. जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका स्थगित होवून तसेच बऱ्याच जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या संचालक मंडळाच्या समितीचा विहित केलेली पाच वर्षांची कालमर्यादा उलटून पंधरा महिन्यापेक्षा जास्त कालावधी संपलेला आहे आणि दिनांक ६ एप्रिल २०२१ रोजीच्या आदेशान्वये राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका दि. ३१ ऑगस्ट २०२१ पर्यत स्थगित करण्यात आलेल्या आहेत. हि बाब विचारात घेऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने मतदार याद्या अंतिम करण्यासाठीची कार्यवाही तात्काळ सुरू करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेऊन निवडणूकीस पात्र असणाऱ्या राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाच्या बाबतीत मतदार यादी तयार करण्यासाठी सभासद संस्थांनी यापूर्वी सादर केलेले ठराव विचारात घेऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया ज्या टप्यावर स्थगित करण्यात आली होती, त्या टप्प्यापासून पुढे तात्काळ सुरु करण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश शासनाने जारी केले आहे. शासनाच्या आदेशामुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा मार्ग देखील मोकळा झाला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar