⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

सोने पन्नाशीच्या दिशेने ; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२१ । आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोन्याच्या भावात दिवसेंदिवस तेजी येत आहे. त्यानुसार भारतातील विविध शहरांतील सोन्याच्या भावातही वाढ दिसून येत आहे. जळगाव सराफ बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली आहे. आजच्या भाव वाढीने सोने पन्नाशीच्या दिशेने जाऊ लागले आहे. आज मंगळवारी सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम ४१० रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या भावात प्रति किलो ४९० रुपयाची वाढ झाली आहे. यापूर्वी काल आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम ४०० रुपयांची तर चांदीच्या भावात प्रति किलो ६६० रुपयाची वाढ झाली होती.

आजचा जळगावात भाव?

जळगाव सराफ बाजारात आज मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,३३० रुपये प्रति तोळा इतका आहे. दुसरीकडे चांदीचा प्रति किलोचा भाव ६७,६९० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये सप्टेबरच्या मध्यापासून घसरण होत असलेल्या सोने-चांदीच्या भावात पितृपक्ष संपल्यानंतर वाढ सुरू झाली. पितृपक्ष संपताना सोने ४८ हजार तोळा होता. नवरात्री सुरु झाली त्यादिवशी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ४७,९२० रुपये इतका होता.  मात्र, त्यानंतर सोन्याच्या भावात सतत वाढ होत राहिली. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा भाव ४९ हजार ०४० रुपये इतका होता. त्यानंतर सोन्याच्या भावात काहीशी घट झाली होती. मात्र गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या भावात पुन्हा वाढ होऊ लागली असून सोने पन्नाशीच्या दिशेने जाऊ लागले आहे.

चांदीच्या भावात देखील गेल्या काही दिवसात मोठी वाढ झाली आहे. नवरात्रीच्या दिवशी चांदीचा प्रति किलोचा भाव ६२,६९० रुपये इतका होता. तो नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी ६४,३६० प्रति किलोवर पोहचला.

दरम्यान, गेल्या दिवाळीत सोन्याच्या प्रति तोळ्याचा भाव ५२,१२० इतका होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याचा कमी असला तरी दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव चांगलाच वधारेल, असे म्हटले जात आहे. दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याची किंमत ५७ हजार रुपयांपासून ६० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. जोपर्यंत चांदीचा प्रश्न आहे, त्यातही मोठी वाढ होऊ शकते. बहुतेक व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की, दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीपर्यंत चांदीचे दर ७६,००० ते ८२,००० रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतात.

गेल्या आठवड्यातील सोने दर?

सोमवारी (१८ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,३२० होते, त्यात ७२० रुपयाची घसरण झाली होती. मंगळावारी (१९ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,४०० इतका होता. त्यात किरकोळ ८० रुपयाची वाढ झाली होती. बुधवारी (२० ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४८,३९० रुपये इतका आहे. त्यामध्ये १० रुपयाची किंचित घट झाली होती. गुरुवार (२१ ऑक्टोबर) प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,६१० रुपयाने इतका आहे. शुक्रवार (२२ ऑक्टोबर) प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,५२० रुपयाने इतका आहे.