⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

आनंदाची बातमी ; दिवाळीपूर्वी सोन्याच्या किंमतीत घसरण, वाचा आजचे भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ नोव्हेंबर २०२१ । जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये दिवाळीच्या एक दिवस आधी आज सोने आणि चांदीच्या भावात घसरण दिसून आली आहे. आज बुधवारी १० ग्रॅम सोन्याच्या भावात २९० रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीचा प्रति किलो तब्बल १६०० रुपयाने स्वस्त झाली आहे.  दरम्यान, दिवाळीपूर्वी सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाल्याने खरेदीची संधी आहे.

जळगावातील आजचा भाव

जळगाव सराफ बाजारात सोमवारी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७४० रुपये प्रति तोळा इतका आहे. दुसरीकडे चांदीचा प्रति किलोचा भाव ६४,७१० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने काल धनत्रयोदशीला सोने व चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांचा अपूर्व उत्साह पाहायला मिळाला. काल मंगळवारी धनत्रयाेदशीला सुवर्णनगरी जळगावात किमान ३५ ते ४० काेटींची उलाढाल झाल्याचा अंदाज जाणकार व्यावसायिकांनी वर्तविला आहे.

सप्टेंबर महिन्यात ४७ हजाराच्या खाली असलेला सोन्याचा भाव ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी मोठी वाढ होऊन तो पुन्हा ४७ हजारावर गेला. यंदाच्या दसरा-दिवाळीत सोन्याची मागणी वाढली. २ ऑक्टोबर २०२१ला शुद्ध सोन्याचे भाव ४७,१५० रुपये प्रति तोळा तर चांदी ६२००० रुपये किलो होती. त्यानंतर महिन्याने धनत्रयोदशीला चोवीस कॅरेट सोने ४८५०० रुपये तोळा तर चांदी ६६००० रुपये किलोवर स्थिरावली आहे. महिन्याभरातच सोने १४०० रुपये तर चांदी ४ हजारांनी वाढली आहे.

गतवर्षीपेक्षा दर कमी

सराफ बाजारात नेहमी चढउतार पाहण्यास मिळत असतात. सोन्‍याचे दर सातत्‍याने वाढत असतात. यंदा मात्र चित्र उलटे असून सोन्‍याचे दर कमी झाले आहेत. याउलट गतवर्षी जळगाव सुवर्णबाजारात सोन्‍याचे दर ५१ हजाराच्‍या वर पोहचले होते. यंदा मात्र ते खाली आले असून ४८ हजार ५०० रूपयांपर्यंत आले आहेत. यामुळे खरेदीचा मुहूर्त साधला जात आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत आता 2500 हजारांनी घसरले दर –

जळगाव सराफ बाजारात गेल्यावर्षी म्हणजेच नोव्हेंबर २०२० मध्ये सोन्याचे दर ५१ हजार २०० रुपये इतका होता. मात्र, यावर्षी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ४९ हजाराच्या घरात आहे. म्हणजेच १२ महिन्यांच्या कालावधीतील घसरणीचा ट्रेंड लक्षात घेतला, तर सोने सुमारे 2500 रुपयांनी कमी झाले आहे.