दसरा पावला; सोने खरेदी २५ टक्क्यांनी वाढली, वाहनांची विक्रमी विक्री

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२१ । साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने, मालमत्ता आणि वाहनांच्या खरेदीसाठी राज्यभरात उत्साह दिसून आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोने खरेदी साधारण २५ टक्क्यांनी वाढली. गेल्यावर्षी करोना संकट आणि जागतिक अस्थिरतेने सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये गेल्या दसऱ्याला सोन्याचा भाव ५२ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला होता. यंदा भाव घसरून बाजारात सोन्याचे भाव ४९ हजार रुपये प्रति तोळ्यावर आले होते.

नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीपासून मागणी वाढत असल्याने जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या भावात गेल्या आठ दिवसात १२८० रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे २४ कॅरेट सोने ४९ हजार ०४० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले आहे.  तर दुसरीकडे चांदी देखील महागली आहे. गेल्या आठ दिवसात चांदीच्या भावात दोन हजार रुपयापर्यंतची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचा प्रति किलोचा भाव ६४ हजार ३६० रुपये इतका आहे.

जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये सप्टेबरच्या मध्यापासून घसरण होत असलेल्या सोने-चांदीच्या भावात पितृपक्ष संपल्यानंतर वाढ सुरू झाली. पितृपक्ष संपताना सोने ४८ हजार तोळा, तर चांदी ६२ हजार रुपये किलो होती. नवरात्र सुरु झाल्यानंतर ८ ऑक्टोबरला सोन्याच्या भावात किंचित १०० रुपयाची घसरण झाली होती. मात्र, त्यानंतर सोन्याच्या भावात सतत वाढ होत राहिली. १४ ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात ७४० रुपयांची वाढ होऊन ते ४९ हजार ०४० रुपयांवर पोहोचले.

चांदीच्या भावातही ८ ऑक्टोबर रोजी वाढ झाली होती.त्यादिवशी चांदीच्या भावात २६० रुपयाची वाढ झाली होती त्यामुळे चांदीचा प्रति किलोचा भाव ६२ हजार ६९० रुपयांवर पोहोचली होती. गुरुवारी देखील चांदीच्या भावात मोठी वाढ झाली होती. काल १३३० रुपयाची मोठी वाढ झाली होती. त्यामुळे चांदीचा भाव ६४ हजार ३६० रुपये प्रतिकिलोवर स्थिरावली.

दसऱ्याच्या दिवशी सोने खरेदीसाठी गर्दी होईल, हा सराफा व्यावसायिकांचा अंदाज बहुतांश खरा ठरला. सऱ्याच्या मुहूर्तावर राज्यात सोन्याची खरेदी-विक्रीत ३५० ते ४०० कोटींचा टप्पा गाठेल, असा विश्वास सराफा बाजाराने व्यक्त केला होता.

सोन्याच्या खरेदी-विक्रीसाठी येणारा ग्राहक नाण्यांपेक्षा दागिन्यांना अधिक महत्त्व देत आहे. नाण्यांच्या खरेदीचे प्रमाण ४० टक्के आहे. तर दागिन्यांच्या खरेदीचे प्रमाण ६० टक्के आहे. हॉलमार्किंगच्या दागिन्यांसह शुद्ध सोन्याची खरेदी विक्री देखील मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या बाजारात तेजी कायम राहील. बाजारात मोठी बुकिंग आहे कारण गेल्या वर्षी कोरोनामुळे बाजारपेठा पूर्णपणे ठप्प होत्या. आता मात्र बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज