fbpx

महापौर इन अँक्शन मोड ; गोलाणीतील तळमजल्याची झाली स्वच्छता

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२१ । जळगाव शहरातील मध्यवर्ती व्यापारी संकुल म्हणून गणल्या जाणार्‍या व महापालिकेच्या सतरा मजली इमारतीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गोलाणी मार्केटमधील तळमजल्यात नेहमीच साचणारे तळे, सांडपाण्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी आणि ठिकठिकाणी साचणारे कचरा, फुले, भाजीपाल्याच्या घाणीचे ढीग ही बाब तेथील गाळेधारकांसह व्यावसायिक, नागरिकांसाठी नेहमीचीच डोकेदुखी बनलेली आहे. यासंदर्भात संबंधितांकडून वारंवार तक्रारीही केल्या जातात. 

मात्र, हा प्रश्न कायमच आहे. याच अनुषंगाने शुक्रवारी, दि. 18 जून 2021 रोजी वृत्तपत्रांनीही वृत्त प्रसिद्ध केले. त्याची महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी गंभीरपणे दखल घेऊन महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचा ताफा गोलाणी मार्केटमधील तळमजल्यात नेऊन सर्व प्रकार प्रत्यक्ष पाहिला. त्यानंतर संबंधित अधिकार्‍यांकडून यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेत तत्काळ सांडपाण्याचा निचरा करून साचलेले कचर्‍याचे ढीग उचलून चोकअप झालेले चेंबर उघडून तेथील पाणी प्रवाही करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर तेथे आणलेल्या व्हॅक्यूम क्लिनर व्हॅनसह यंत्रणेच्या सहाय्याने संपूर्ण चोकअप चेंबर उघडून त्यात जीव धोक्यात घालत कर्मचारी उतरून पाण्याचा निचरा करण्यासह तेथील परिसर स्वच्छ करण्यात आला. 

दरम्यान, या गंभीर समस्येसंदर्भात महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी पुन्हा सायंकाळी आपल्या दालनात आयुक्त श्री.सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांची बैठक बोलावून गोलाणी मार्केटमधील विविध प्रश्नांसंदर्भात कुठलीही कारणे न सांगता तेथील समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासंदर्भात तत्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, असे आदेश दिले.

महापालिका आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.पवन पाटील, प्रभाग समिती क्र. 1 चे अधिकारी श्री.व्ही.ओ. सोनवणे, आरोग्य निरीक्षक श्री.कांबळे यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी विविध वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेले वृत्त सकाळीच वाचले अन् महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना सोबत घेऊन गोलाणी मार्केटमधील तळमजला गाठला. तेथील साचलेणे सांडपाणी, कुजक्या भाजीपाला, फुलांच्या साचलेल्या घाणीचे ढीग आणि चोकअप झालेले चेंबर या स्थितीमुळे निर्माण झालेली दुर्गंधी पाहून संतप्त स्वरात साचलेले सांडपाणी काढून घाणीचे ढीग तत्काळ उचला. चोकअप झालेले चेंबर उघडून संपूर्ण पाण्याचा निचरा करा, काहीही घाण ठेवू नका, अशा संबंधितांना सूचना केल्या. त्यानंतर कर्मचारी जीव धोक्यात घालत चेंबर उघडून खाली उतरले व त्यांनी 2 रिड्युस पाईप टाकून सांडपाणी प्रवाही केले.

दरम्यान, सायंकाळी पुन्हा आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचार्‍यांना महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी आयुक्त श्री.सतीश कुलकर्णी यांच्यासह आपल्या दालनात बैठकीसाठी बोलावून गोलाणी मार्केटमधील विविध समस्या या वर्षानुवर्षे कायमच आहेत. त्यामुळे त्यावर नुसतेच तात्पुरते उपाय न योजता सर्व समस्या कायमस्वरूपी निकाली काढा. यापुढे कुठलीही कारणे ऐकून घेतली जाणार नाहीत. तत्काळ उपाय शोधून कायमस्वरूपी ते अमलात आणण्याचे आदेश दिले. यापुढे गोलाणीच नव्हे, तर कोणत्याही व्यापारी संकुलातील अस्वच्छतेचा प्रश्न खपवून घेतला जाणार नाही, अशी तंबीही यावेळी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी संबंधितांना दिली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज