पटसंख्येवर मराठी शाळेचे वैभव टिकून : ना. गुलाबराव पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२१ । ”फोरजी, फाईव्हजी असे कितीही ‘जी’ आलेत, तरी ‘गुरूजी’ आहेत म्हणून भविष्य उज्वल आहे. यामुळे शिक्षकांनी गुरूजी असल्याचा अभिमान बाळगावा. पटसंख्येवर मराठी शाळेचे वैभव टिकून असल्याने पटसंख्या टिकवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न करावे” असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. शिक्षक सेनेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.*
राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षक सेनेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. यात जिल्हाभरातील शिक्षकांचा समावेश होता. आज शहरातील कांताई सभागृहात या पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
ना. गुलाबराव पाटील यांनी शिक्षक सेनेने आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले. ते म्हणाले की, काळाच्या ओघात शिक्षण हे बरेच बदलले आहे. आधी विद्यार्थ्यांना सुटीच्या दिवशी शेतात काम करावे लागत असे. यामुळे आता शिक्षण देखील बदलले आहे. अर्थात काळ कितीही बदलला तरी शिक्षकांचे महत्व अबाधित आहे. आपण जिल्ह्यात पालकमंत्री संरक्षण भिंत ही योजना यशस्वीपणे राबविली आहे. याच प्रकारे आता येत्या काळामध्ये शाळांमध्ये १६ कलमी कार्यक्रम राबविणार असल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी याप्रसंगी केली. आदर्श शिक्षक पुरस्कारांची संख्या मर्यादीत असते, यामुळे अनेकांवर अन्याय होत असतो. विशेष करून यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याची तक्रार असते. यामुळे या पुरस्कारांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको ही आपली भूमिका असल्याचे पालकमंत्री म्हणाले. ते पुढे म्हणाले की, राजकारणी हा डॉक्टरप्रमाणे असतो. अर्थात डॉक्टरांच्या शाखा असल्या तरी पुढारी हा जनरल फिजीशियन सारखा असतो. त्याच्याकडे सर्व जण तक्रारी घेऊन येतात. यामुळे सर्वांनी राजकारण्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, राज्य सरकारने कोरोनाच्या आपत्तीच्या काळातही शिक्षकांचे पगार थकवले नाहीत. आता लवकरच शाळा सुरू होत आहेत. याप्रसंगी शिक्षकांची कोरोनाच्या नियमांचे पालन करून विद्यादान करण्याचे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आमदार चिमणआबा पाटील यांनी सांगितले की शिक्षकांना समाजात वेगळे स्थान असून पिढी घडविण्यासाठी शिक्षकांनी जबाबदारी घ्यावी. आजच्या परिस्थिती शिक्षण व आरोग्य क्षेत्रात भरीव काम करण्याची गरज आहे. आमदार किशोरआप्पा पाटील म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या शाळा या शैक्षणिक संस्था बनल्या पाहिजेत. यासाठी त्यांच्या बळकटीकरणाची आवश्यकता आहे. तसेच त्यांनी शैक्षणिक क्षेत्रासाठी ना. गुलाबरावजी पाटील यांनी केलेल्या कामांचा गौरव केला. माजी आमदार तथा सहसंपर्क प्रमुख प्रा. चंद्रकांत सोनवणे म्हणाले की, आई-वडिलांच्या नंतर आयुष्यात गुरूजनांचेच महत्व असते. कोविडच्या काळात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद तुटला असून आता तो पुन्हा जुळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी पं स सभापती ललिताताई पाटील व महापौर जयश्री महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी पालकमंत्र्यांसह सर्व मान्यवरांच्याहस्ते शिक्षक सेनेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यासपीठावर आमदार किशोरआप्पा पाटील, आ. चिमणआबा पाटील, माजी आमदार तथा सहसंपर्क प्रमुख प्रा.चंद्रकांत सोनवणे, राज्य शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष शेख इलयास , शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ भंगाळे, डॉ. हर्षल माने, महापौर जयश्री महाजन, पं. स. सभापती ललिता पाटील, जनाअप्पा पाटील (कोळी) तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन,
आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, अनिल चौधरी, नाना पाटील, राजेंद्र पाटील, टिकारामसिंग पाटील, प्रत्येक तालुक्यातील तालुकास्तरावरील सर्व शिक्षक सेनेचे पदाधिकारी व शिक्षक यांनी शिक्षक सन्मान उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस नाना पाटील यांनी जिल्ह्यातील शिक्षक सेने चे कार्य व संघटना बांधणी संदर्भात सविस्तर माहिती विशद केली. सूत्रसंचालन उपशिक्षक संदीप पवार व रमेश बोरसे यांनी केले तर आभार जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे यांनी मानले.
बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज