जामनेरात बालिकेचा विनयभंग : जमावाची पोलिसांवर दगडफेक, चार पोलीस जखमी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२२ । जामनेर येथे सहा वर्षीय बालिकेचा एका वृद्धाने विनयभंग केल्याची घटना ३१ रोजी घडली. हा प्रकार लक्षात येताच बालिकेच्या नातेवाईकांनी संतप्त होऊन संशयित वृद्धाला मारहाण केली. हाफिस बेग मेहमूद बेग (वय ५८) असे संशयित आरोपीचे नाव आहे. दरम्यान, हा प्रकार पोलिसांपर्यंत पोहचताच संशयिताला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही संतप्त जमावाने दगडफेक केली. यात पोलिसांच्या वाहनाची काच फुटून चार पोलिस जखमी झाले असून संशयिताला अटक करण्यात आली आहे.

सविस्तर असे की, जामनेरातील जुना बोदवड रोडवरील घरकुलातील रहिवासी हाफिस बेग मेहमूद बेग (वय ५८) या वृद्धाने परिसरातील सहा वर्षीय बालीकेला, खाऊचे आमिष दाखवून घरात बोलावले. संशयिताने बालिकेचा विनयभंग केला. याचवेळी शेजारील महिलेने बालिकेच्या कुटुंबियांना या प्रकाराची माहिती दिली. त्यामुळे बालिकेचे कुटुंबिय संशयिताच्या घरात घुसले. त्यावेळी संशयित वृद्धाने बालिकेच्या कुटुंबियांशी अरेरावी केली. याबाबत चर्चा होताच घटनास्थळी मोठा जमाव जमला. काहींनी संशयिताला मारहाण केली. दरम्यान हा प्रकार पोलिसांपर्यंत पोहचताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाचा संताप पाहता पोलिस कर्मचाऱ्यांनी पोलिस निरिक्षक किरण शिंदे यांना घटनेची माहिती कळवली. शिंदे यांनी तात्काळ फौजफाट्यासह घटनास्थळ गाठले. जमावाची समजूत काढून संशयिताला पोलिसांनी सोबत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त जमावाने पोलिसांवरच दगडफेक केली. यात पोलिसांच्या वाहनाची काच फुटून चार पोलिस जखमी झाले. याप्रकरणी बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादिवरून हाफिस बेग याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात झाला.

जमावावर सौम्य लाठीमार

बालिकेच्या विनयभंगाची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक किरण शिंदे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. यावेळी संशयिताला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत संतप्त जमावाने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवून नागरीकांच्या तावडीतून संशयिताला सोडवत तेथून निघण्याचा प्रयत्न केला. म्हणून संतप्त जमावाने दगडफेक केल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करून गर्दी पांगवली.

सुदैवाने अनर्थ टळला

शुक्रवारी घरकुलातील बहुतांश पुरुष मंडळी दुपारी घराबाहेर गेले होते, तर महिला घरकामात होत्या. यावेळी परिसरात एकांत होता, त्याचा गैरफायदा घेत हाफीस बेग याने बालिकेचा विनयभंग केला. पोलिस वेळवर घटनास्थळी पोहचले नसते, जमावाने संशयिताला बेदम चोपले असते.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -