जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२२ । चाळीसगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन बहिणी शेतातून घरी जात असतांना गावातील दोन तरुणांनी रस्ता अडवत ‘तुमचे लग्नच होवू देणार नाही’ अशी धमकी दिली. या प्रकारामुळे भेदरलेल्या दोनपैकी एका अल्पवयीन बहिणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. याप्रकरणी धमकी देणाऱ्या दोन तरुणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीगाव तालुक्यातील दोन बहिणी शेतातून घरी जात असतांना गावातच राहणाऱ्या दिलीप जगन सोनार आणि वासुदेव रायसिंग चव्हाण या तरुणांनी त्यांचा रस्ता अडवून छेड काढली. या प्रकारामुळे दोघीही बहिणी घाबरल्या होत्या. या तरुणांनी ‘तुमचे लग्नच होवू देणार नाही’, अशी धमकी देखील या दोन्ही बहिणींना दिली होती. तरुणांपासून स्वत:ची सुटका करुन घेत दोन्ही बहिणी कशाबशा घरी पोहोचल्या.
मात्र, या घटनेमुळे दोघीही प्रचंड घाबरल्या होत्या. या तरुणांच्या धमकीला अल्पवयीन मुलगी खूपच घाबरली होती. याच भीतीपोटी एका बहिणीने त्याच रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला या घटनेमागचे कारण स्पष्ट होत नव्हते. नंतर दुसऱ्या बहिणीने कुटुंबीयांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली.
पोलिसांनी संपूर्ण चौकशी केली असता दिलीप आणि वासुदेव हे दोघे प्राथमिक चौकशीत दोषी आढळले. त्यानुसार अल्पवयीन मुलीच्या पालकांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.