नोकरीच्या बहाण्याने विवाहितेला अडीच लाखात गंडविले

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२१ । शहरातील संभाजी नगरात राहणाऱ्या एका २३ वर्षीय विवाहितेला भारती एअरटेल कंपनीत नोकरी मिळवून देण्याचे आमिष देत भामट्याने २ लाख ४२ हजार ४५० रुपयांचा गंडा घातला आहे. बुधवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

संभाजी नगरातील विवेक कॉलनीत राहणाऱ्या जयश्री राजेंद्र सोनवणे या उच्चशिक्षित असून मू.जे.महाविद्यालयात एम.कॉमचे शिक्षण घेत आहेत. २७ जून २०२१ रोजी त्यांच्या मोबाइवर ‘एअरटेल एसएमएस जॉब’ संदर्भात मेसेज आला. यात जॉबसाठी दिलेल्या वेबसाइटवर कागदपत्रे अपलोड करण्याचे सांगितले. त्यानुसार जयश्री यांनी शैक्षणिक कागदपत्र अपलोड केले. त्यानंतर २८ जून रोजी त्यांचे सिलेक्शन झाल्याचे एक मेसेज आला. अमित अग्रवाल नावाच्या व्यक्तीने मोबाइलवर जयश्री यांना कामाच्या संदर्भात काही माहिती दिली. यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फी भरावी लागेल असे सांगत ३ जुलै रोजी फोन पे द्वारे १८५० रुपये जयश्री यांच्याकडून ऑनलाइन मागवून घेतले.

दुसऱ्या दिवशी अमितने मोबाइल, एम्प्लाॅयमेंट कार्ड, लॅपटॉप, एसएमएस बुक, प्रिंटर, माऊस अशा वस्तू घरी पाठवून तुम्हाला याच्यावर काम करायचे आहे. या वस्तूंचा इन्शुरन्स काढायचा असल्याचे सांगून पुन्हा ८६५० रुपये मागवून घेतले. त्यानंतर पुन्हा तुमचे पैसे परत करायचे आहेत, त्यासाठी बँक खात्यावर रक्कम भरा हे देखील कारण त्याने पुढे केले. अशा विविध कारणांपोटी अमितने दोनच दिवसांत २ लाख ४२ हजार ४५० रुपये उकळले. दरम्यान, वारंवार पैशांची मागणी होत असल्याने जयश्री यांना संशय आला. त्यांनी सर्व पैसे परत मागितल्यानंतर अमितने मोबाइल बंद केला. आपली फसवणूक झाल्याचे निष्पन्न होताच जयश्री यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयश्री या विवाहित असून पतीपासून विभक्त राहतात. एक वर्षाची मुलगी काव्यासह आजी, आजोबांकडे राहून त्या आपले शिक्षण पूर्ण करीत आहे. शिक्षणासोबतच नोकरीची संधी मिळणार असल्याने त्यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क केला होता परंतु पैसे तर गेलेच आणि नोकरी देखील न मिळाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -