fbpx

अखंड मिरवणुकीचे समन्वयक झाले नियाज अली काका, गृह विभागाची लागत होती परवानगी

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगावातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या गालबोटनंतर १९९४ मध्ये सार्वजनिक गणेश महामंडळाचा पाया रचला गेला. विसर्जन मिरवणुकीत मंडळांची संख्या वाढत असताना मिरवणूक मार्गात मस्जिदसमोर आल्यावर नमाजच्या वेळी वाद्य वाजविताना अडचण आणि तणाव निर्माण होत होता. तेव्हा नियाज अली काका यांनी समन्वयकाची भूमिका पार पाडली आणि अखंड गणेश विसर्जन मिरवणुकीचा पायंडा रचला गेला.

जळगावात सार्वजनिक गणेश महामंडळाच्या स्थापनेनंतर नवनवीन पायंडे रचण्यात आले. अभिनव उपक्रमांची सुरुवात झाली ती आजही कायम आहे. विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागल्यानंतर जुनी मनपा इमारत ते घाणेकर चौक केवळ ७ मंडळांचा सहभाग होता. १९९७ पर्यंत सुरुवातीला फक्त १९ मंडळ सहभाग नोंदवित होते. हळूहळू उत्सव मोठा झाला. मिरवणुकीत ३५ मंडळाचा सहभाग झाला. काळ बदलला तरी कायदे मात्र इंग्रजांच्या काळातील होते. तेव्हा सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी गृह मंत्रालयाची परवानगी लागत होती.

mi advt

समन्वयानंतर कायम राहिली अखंड मिरवणूक

सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीचा आज दिसत असलेला मार्ग सार्वजनिक गणेश महामंडळाने निश्चित केला होता. मिरवणुकीत गणेश मंडळांचा सहभाग वाढविण्यासाठी सर्व मंडळांची जबाबदारी गणेश महामंडळाने स्वीकारली. मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी गृह मंत्रालयाची परवानगी लागत नसल्याने मंडळांची संख्या वाढू लागली. विसर्जन मिरवणूक मार्गावर भिलपुरा मश्चिद होती. सायंकाळच्या वेळी नमाज पठन होत असताना वाद्य बंद करण्याची मागणी होत होती त्यामुळे मिरवणुकीत खंड पडत होता. दोन्ही समाजातील एकोपा कायम राहण्यासाठी लालशा बाबा ट्रस्टचे अध्यक्ष नियाज अली काका यांनी पुढाकार घेतला. समन्वयकाची भूमिका बजावत नियाज अली यांनी भिलपुरा ट्रस्ट आणि गणेश महामंडळात समन्वय घडवून आणला. डॉ.अविनाश दादा आचार्य, नियाजअली काका आणि सचिन नारळे यांनी वारंवार बैठक घेत चर्चा केली आणि त्यानंतर एक सलोखा समिती तयार केली. गणेश मंडळांच्या सत्कारासाठी सर्वधर्मीय व्यासपीठ उभारण्यात आले. नमाज सुरु असताना मिरवणुकीत खंड पडू नये यासाठी लेझीममध्ये मशिदीला मानवंदना देण्याची प्रथा सुरु झाली. सत्कार आणि समन्वयामुळे परिणाम आणि परिमाण राखले गेले.

तरुणांच्या पुढाकाराने मिरवणूक सुरळीत

२००० वर्ष उजाडल्यानंतर जळगाव महानगर होऊन अनेक लहान मोठी उपनगर शहराला जोडली गेली होती. वस्ती आणि विस्तार दोन्ही वाढल्याने मंडळांची संख्या देखील वाढली. स्थगित झालेली विसर्जन मिरवणूक बऱ्यापैकी पूर्वपदावर आली होती. सर्वधर्मियांचा आदर राखत जनप्रबोधनाचा वारसा पुढे नेला जात होता. श्री विसर्जन मिरवणुकीच्या नियोजन आणि नेतृत्वाची जबाबदारी तरुणांवर आली होती. गणेश महामंडळाचे सक्रिय पदाधिकारी व कार्यकर्ते सचिन नाराळे, किशोर भोसले, मुकुंद मेटकर, दीपक जोशी, अमित भाटिया, ललित चौधरी, रविंद्र नेरपगारे, मुन्ना परदेशी, अनिल वाणी, कैलास सोनवणे, अजय गांधी, सुजित जाधव आदींच्या प्रयत्नाने श्री विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडू लागली. मिरवणुकीची व्याप्ती जसजशी वाढू लागली तसे सार्वजनिक गणेश महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांच्यासोबत सुरज दायमा, राकेश लोहार, राहुल परकाळे, भूषण शिंपी, कवी कासार, दीपक दाभाडे, प्रशांत पाटील, हेमंत महाजन, विराज कावडीया, अमित जगताप, राकेश तिवारी, धनंजय चौधरी हे देखील सेवा देऊ लागले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज