जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२२ । सध्या पावसाळा सुरु आहे. आणि या पावसाळ्यात जण-जनावरांचा वावर जास्तच असतो. दरम्यान, यावल तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत तिघांना सर्पदंश झाला असून एकाची प्रकृती खालावल्याने त्यास जळगावी हलवण्यात आले. यातील सर्वात धक्कादायक बातमी म्हणजे नावरेच्या गणेश मिस्तरी यांना तब्बल सोळाव्यांदा सर्पाने चावा घेतल्याने कुटुंबियांनी डोक्याला हात मारून घेतला आहे. काही केल्या सर्प मिस्तरी यांचा पिच्छा सोडत नसल्याने मिस्तरी यांच्यासह त्यांचे कुटूंबही या प्रकारांना वैतागले आहेत.
यांना घेतला चावा
कोळवद, ता.यावल येथील शुभांगी अशोक कोळी (18) या तरुणीस डाव्या हाताला सर्पाने दंश केला तसेच कोळवद गावातीलच विमलबाई अभिमान तायडे (65) ही महिला शेतात काम करत असताना तिच्या उजव्या हाताला सर्पाने दंश केला. तिसर्या घटनेत नावरे गावातील गणेश देविदास मिस्तरी (42) यांना पायाला सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येतात दोघांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरीता दाखल करण्यात आले.
तरुणीची प्रकृती खालावली
सर्पदंश झालेल्या रुग्णांवर यावल रुग्णालयात डॉ.अमीन तडवी, अधिपरीचारीका ज्योत्स्ना निंबाळकर, अधिपरीचारक जॉन्सन चोरटे, बापू महाजन, पिंटू बागुल आदींनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले. यातील शुभांगी कोळीची प्रकृती खालवल्यानी तिला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.