fbpx

वर्तमानातील भयांकित आणि प्रश्नांकित जगासमोर गांधी विचार आशेचा किरण : डॉ. रामदास तोंडे

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२१ । देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात देशातील जनतेला एकसंध करण्यासाठी गांधीजी अखेरपर्यंत कार्यरत राहिलेत. सत्य, सेवा, सत्याग्रह आदी मूल्यांना प्रत्यक्ष जीवनात उतरविणाऱ्या बापूंनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांना देखील आपल्या कृतीतून जगासमोर आदर्श ठेवला. राजकारण, समाजकारण, शैक्षणिक पुनर्रचना, पारस्पारिक सहजीवन इत्यादी मानवी जीवनाच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक सर्व पैलूंवर गांधीनी सखोल विचार प्रकट केले आहेत. आताच्या पिढीने त्यांनी केलेल्या कार्याचा अभ्यास करावा. गांधी समजून घेतांना त्यांचे ‘बोले तैसा चाले’ आचरण सुद्धा समजून घेतले पाहिजे. त्यांचा कृती आणि विचार अत्यंत प्रभावी आहेत, मला वाटते वर्तमानातील भयांकित आणि प्रश्नांकित जगासमोर गांधी विचार आशेचा किरण आहे, असे प्रतिपादन वसई येथील संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयातील साहित्यिक डॉ. रामदास तोंडे यांनी केले.

जळगावातील मूळजी जेठा महाविद्यालयात २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि महात्मा गांधी अध्ययन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गांधी समजून घेतांना’ या विषयावर ऑनलाईन पद्धतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून डॉ. रामदास तोंडे उपस्थित होते. याप्रसंगी ते बोलत होते.

mi advt

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाषा प्रशाळेचे संचालक डॉ. भूपेंद्र केसुर हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, ‘महात्मा गांधी यांचा एक विचार जरी व्यवस्थित समजून घेतला आणि त्याला आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याचा निश्चितच फायदा होईल. मोबाईल आणि इंटरनेटच्या मूळ उद्देशाला बाजूला ठेवून व्यक्ती हा व्यक्ती पासून दुरावत चालला आहे, त्याला जोडून ठेवणे, त्याच्याविषयी आत्मीयता आणि सामोपचार वाढवणे, काळाची गरज आहे. या संदर्भात गांधीजी आपल्याला त्यांच्या विचारातून दिशादर्शन करतांना दिसतात, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन महात्मा गांधी अध्ययन केंद्राचे समन्वयक प्रा. विजय लोहार यांनी केले. तर आभार रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. दिलवरसिंग वसावे यांनी मानले. रासेयोचे सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. नम्रता महाजन, डॉ. विशाल देशमुख, डॉ.योगेश महाले यांसह ५० विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज