fbpx

गांधी मार्केटमधील चेंबर स्वच्छतेसह सांडपाणी केले प्रवाही

महापौर महाजन व उपमहापौर पाटील यांच्या आदेशावरून ‘मनपा’तर्फे कार्यवाही

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । 22 जून २०२१ । जळगाव शहरातील मध्यवर्ती व्यापारी संकुल म्हणून गणल्या जाणार्‍या ‘गोलाणी’सह शहरातील विविध मार्केटमधील तळमजल्यात नेहमीच साचणारे तळे, सांडपाण्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी, ठिकठिकाणी साचणारा कचरा, चोकअप झालेले चेंबर ही बाब तेथील गाळेधारकांसह व्यावसायिक, नागरिकांसाठी नेहमीचीच डोकेदुखी बनलेली होती. 

यासंदर्भात संबंधितांकडून वारंवार तक्रारीही केल्या जात होत्या. मात्र, हा प्रश्न कायमच होता. याच अनुषंगाने वृत्तपत्रांनीही वृत्त प्रसिद्ध केले. त्याची महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी गंभीरपणे दखल घेऊन महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचा ताफा गोलाणी मार्केटमधील तळमजल्यात नेऊन सविस्तर माहिती जाणून घेत तत्काळ सांडपाण्याचा निचरा करून साचलेले कचर्‍याचे ढीग उचलून चोकअप झालेले चेंबर उघडून तेथील पाणी प्रवाही करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार तेथील सर्व स्वच्छता झाली. 

याचवेळी या गंभीर समस्येसंदर्भात महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी आपल्या दालनात आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांची बैठक बोलावून शहरातील सर्व व्यापारी संकुलांतील विविध प्रश्नांसंदर्भात कुठलीही कारणे न सांगता तेथील समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासंदर्भात तत्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, असे आदेश दिले होते. याप्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील उपस्थित होते. त्याचाच भाग म्हणून आज मंगळवार, दि. 22 जून 2021 रोजी महात्मा गांधी मार्केटसह परिसरातील संपूर्ण चोकअप चेंबर उघडून त्यात जीव धोक्यात घालून कर्मचारी उतरून पाण्याचा निचरा करण्यासह तेथील परिसर स्वच्छ करण्यात आला.

महापालिका आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त पवन पाटील, आरोग्य निरीक्षक कांबळे, अधीक्षक एस.पी. अत्तरद यांच्यासह  मुकादम रवी सनकत, निरंजन चांगरे व आरोग्य विभागाचे कामगार यावेळी उपस्थित होते.

गेल्या सहा-सात महिन्यांपासून महात्मा गांधी मार्केटमधील चेंबर तुंबलेले होते. त्यामुळे दुकानांसमोर सांडपाण्याचे तळे साचले होते. तसेच मार्केटमधील बाथरूम व शौचालयाचे घाण पाणी वाहून जाण्यास अडथळा ठरत होता. या गैरसोयीमुळे गाळेधारकांसह मार्केटमध्ये खरेदीसाठी येणारे ग्राहकही हैराण होते. या पार्श्वभूमीवर आज महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी सर्व चेंबर साफ करून सांडपाणी प्रवाही केले. लवकरच सर्व व्यापारी संकुलांतील उघड्या अवस्थेतील चेंबर संपूर्णपणे बंद केले जाणार आहेत. जेणे करून ते चोकअप होणार नाहीत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज