जळगावात रेल्वेतून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू ; ऑनलाईन मागविलेल्या बुटांवरून पटली ओळख

बातमी शेअर करा

जळगाव  लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२१ । पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या गडचिरोली येथील तरुणाचा शिरसोली-दापोरा दरम्यान धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली होती. दोन दिवसांनंतर पायातील बुटांवरून या तरुणाची ओळख पटली. अभिजीत गजानन मेश्राम (वय १९, रा. गडचिरोली) असे मृत तरुणाचे नाव आहे. शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

पुणे येथील व्हीआयआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभिजीत मेश्राम मॅकेनिकल इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होता. अभिजीत व त्याचा मित्र परीमल गोपीनाथ कोडापे (वय १९) हे दोघे बुधवारी ( दि. १) गडचिरोली येथून एसटी बसने नागपूरला आले. तेथून गरीब रथ एक्स्प्रेसने पुण्याला जाण्यासाठी निघाले होते.

अभिजीत रेल्वेत दाराजवळ उभा होता. जळगाव स्थानकावरून रेल्वे पुढे गेल्यांनतर शिरसोली-दापोरा दरम्यान अभिजीत धावत्या रेल्वेतून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

सकाळी परीमलला जाग आल्यावर त्यानं अभिजीतचा शोध घेतला. दुसरीकडे पहाटे ४.४५ वाजता जळगाव लोहमार्ग पोलिसांनी अभिजीतचा मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. त्याच्या खिशात काहीच न मिळाल्याने ओळख पटली नाही. तालुका पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

गुरुवारी दुपारी पोलिसांनी जळगाव स्थानकावर येऊन संबधित मृताची माहिती पुण्यापर्यंतच्या स्टेशनवर कळवली. त्यानतंर अभिजीचे आई-वडील त्याचा शोध घेत गुरुवारी अहमदनगर रेल्वे स्थानकावर गेले होते. त्यांना ही माहिती मिळाल्याने ते आज शुक्रवारी सकाळी जळगावात पोहोचले. अभिजीतच्या मोबाइलमध्ये ऑनलाइन मागवलेल्या बुटाचे फोटो होते. तेच बूट त्याच्या पायात आढळून आल्याने कुटुंबीयांनी मृतदेह ओळखला, त्यांना मोठा धक्का बसला. शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. मृत अभिजीतच्या पश्चात आई-वडील व लहान बहीण असा परिवार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -