बहिण-भावाची एकाच वेळी निघाली अंत्ययात्रा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२१ । घरात लग्नाचा आनंद, सर्व तयारी झाली, नवरीच्या स्वागतासाठी घर सजले, कुटुंबीय नटले आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. जामनेर-पाचोरा रस्त्यावर झालेल्या अपघातात नवरदेवाच्या मोठ्या भावासह चुलत बहिणीचा व पार्लरचालक विवाहितेचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. नवरीच्या स्वागतासाठी टाकण्यात आलेल्या मंडपात स्वागताऐवजी बहीण-भावाची शोकाकुल वातावरणात एकाच वेळी अंत्ययात्रा काढावी लागल्याने सर्वांचेच डोळे पाणावले.

जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच असून दररोज कुणाला तरी आपले आप्तेष्ट गमवावे लागत आहेत. पाच दिवसांपूर्वी अमळनेर तालुक्यातील एकाच कुटुंबातील तिघांची एकाच दिवशी अंत्ययात्रा निघाली होती. गुरुवारी जामनेर-पाचोरा रस्त्यावर लहान भावाच्या लग्नासाठी जात असलेल्या कुटुंबियांवर काळाने घाला घातला. अपघातात पंकज गोविंदा सैंदाणे (३२) आणि प्रतिभा जगदीश सैंदाणे (3० रा.तुकाराम नगर, भुसावळ) ही भावंडे आणि सुजाता प्रवीण हिवरे (३०, रा.त्रिमूर्तीनगर, रा.भुसावळ) असे तिघे ठार झाले तर अवघ्या १० महिने वय असलेला स्पंदन पितृप्रेमाला पारखा झाला.

भावाच्या अपघाती निधनाने नवरदेवासह नवरीवरही मोठा मानसिक आघात झाला. अपघातात हर्षा सैंदाणे, नेहा अग्रवाल आणि सहा महिन्यांचा चिमुकला स्पंदन सैंदाणे हे जखमी झाले. लग्नासाठी दारापुढे टाकण्यात आलेल्या मंडपातून काळजावर दगड ठेवत गुरुवारी सायंकाळी उशिरा एकाच वेळी बहीण भावाची अंत्ययात्रा काढण्यात आली. हे दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यातून अश्रू तरळले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -