fbpx

संबंध नसताना माझ्या माथी खापर फोडले : अमर जैन

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२१ । शहरातील वासुकमल बिल्डर आणि वासुकमल विहारच्या रहिवाशांचा वाद चांगलाच पेटला आहे. बुधवारी रात्री झालेल्या प्रकाराशी माझा काहीही संबंध नसताना देखील माझ्याविरुद्ध जाहिरात देत बदनामी करण्यात आली, असे माजी नगरसेवक व फ्लॅटधारक अमर जैन यांनी सांगितले. तसेच अमर जैन यांचा काहीही संबंध नसून बिल्डर त्यांचे नाव घेत असल्याचा आरोप देखील इतर रहिवाशी महिलांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

गुजराल पेट्रोलपंप लगतच्या वासुकमल विहार या रहिवासी अपार्टमेंटचे निर्माते वासुकमल इन्फ्राबिल्डर आहे. सोसायटीमध्ये एकूण ४८ रहिवासी फ्लैटमधील जवळपास ४२ रहिवाशी फ्लॅट मालकांनी बिल्डरकडून फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे. या तक्रारदारांनी यापूर्वी जिल्हाधिकारी व पोलिसांकडे अर्जफाटे केले आहेत. घटस्थापनेच्या दिवशी सोसायटी व ९० लाख रूपये अनामत हस्तांतरण संदर्भात विचारणा करायला ३०/३५ महिला व पुरूष रहिवाशी बिल्डरच्या कार्यालयात गेले होते. तेव्हा बिल्डर चर्चेसाठी कार्यालयात आले नाही पण त्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलीस आल्यावर देखील बिल्डर तेथे आले नाही.

वासुकमल विहारमधील विविध तक्रारींबाबत रहिवासी एकत्र आले आहेत. त्यात फ्लॅटधारक माजी नगरसेवक अमर जैन हे देखील आहेत. पोलीस व रेराकडे तक्रारी करायला सर्वजण एकत्र असताना बिल्डरने मात्र जैन यांना टार्गेट केले आहे. जैन यांच्यामुळे सर्वजण एकत्र आल्याचा रोष व्यक्त करीत बिल्डरने माध्यमातून अमर जैन यांच्या विरोधात नम्र निवेदन दिले आहे. त्यात अगोदर दावा केला आहे की, ‘जैन हे अप्रामाणिक हेतुने बिल्डरची सोशल मीडियात बदनामी करीत आहेत. दरम्यान, रहिवाशांनी आणि अमर जैन यांनी सर्व आरोप पत्रकार परिषदेत फेटाळून लावले आहेत.

रहिवाशांनी शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप देखील बिल्डरने जाहिरातीतून केला असून आम्ही महिला वर्ग आपल्या लहान मुलांसह गेलो होतो. बिल्डरच्या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे देखील असून ते त्यांनी तपासावे. आम्ही कोणतीही शिवीगाळ केली नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘वासुकमल विहारमध्ये काही अडचणी असतील तर आम्ही त्या निश्चितपणे सोडवू. आम्ही सनदशीर मार्गाने संवादाने न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेऊन मार्ग काढण्यास तयार असल्याचे जाहिरातीत म्हटले आहे. आजवर आम्ही अडचणी सोडविण्यासाठी वारंवार आपल्याकडे आलो पण आपण दाद दिली नाही. कायदेशीर मार्गाने लढा देत असताना देखील सुविधा मिळत नसल्याने आम्हाला आमचा पुढील पवित्रा घेत दाद मागायला घटस्थापनेच्या दिवशी पोलीस ठाण्यात यावे लागल्याचे रहिवाशांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज