एस.टी. कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण; पंधरा आगारातून सुटली नाही एकही बस

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२१ । राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून बुधवार दि.२७ पासून बेमुदत उपोषण पुकारण्यात आले आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी जळगाव जिल्ह्यातील सर्व पंधरा आगारातून एकही बस न सुटल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. जळगाव आगारातही शुकशुकाट दिसून येत होता.

वार्षिक वेतन वाढीचा दर २ टक्के ऐवजी ३ टक्के मान्य केल्याप्रमाणे लागू करण्यात यावा, घर भाडे भत्ता ७, १४, २१ ऐवजी ८, १६, २४ मान्य केल्याप्रमाणे लागू करण्यात यावा, राज्य शासनाप्रमाणे महागाई भत्त्याचा दर २८ टक्के लागू करण्यात यावा, शासकीय नियमाप्रमाणे सन अग्रीम रक्कम १२ हजार ५०० रुपये देण्यात यावा, दिवाळी भेट १५ हजार रुपये, दिवाळी पूर्वी देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी जळगाव येथील राज्य परिवहन विभागीय कार्यालयासमोर संयुक्त कृती समितीकडून बुधवार दि.२७ पासून बेमुदत उपोषण पुकारण्यात आले आहे. गुरुवार दि.२८ रोजी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी जळगाव जिल्‍ह्यातील पंधरा आगारांमधून एकही बस सुटली नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. पहाटे पाच वाजेपासून एकही बस न सुटल्याने बाहेरगावी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. अचानक बस बंद झाल्‍याने शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची देखील मोठी गैरसोय झाली.

बस स्थानकात शुकशुकाट
उपोषणाच्या पहिल्‍या दिवशी काही प्राणात बस सुरु होत्या, मात्र उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजेपासून कोणतीच बस फेरी न सुटल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. बस स्थानकात प्रवासी बसची वाट पाहताना दिसून येत होते. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे बस सुटणार नसल्याचे समजल्यावर अनेकांना खासगी वाहनांमधून प्रवास करावा लागला. जळगाव मध्‍यवर्ती बसस्थानकावर माहिती देण्यासाठीही कोणी अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हते. चौकशी केबिनमध्ये देखील कर्मचारी नसल्यामुळे कॅबिन बंद स्थितीत होती. दुपारपासून बसस्‍थानकात शुकशुकाट दिसून आला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज