सांगवी-भालोद रस्त्यावर आढळले स्री-जातीचे अर्भक

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२१ । यावल तालुक्यातील सांगवी-भालोद रस्त्यावरील एका शेताजवळ नवजात स्री-जातीचे अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवार दि.१९ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील सांगवी-भालोद रस्त्यावरून काही शेतमजूर शेतात कामाला जात असतांना या शेतमजुरांना हरी बोरोले यांच्या शेताजवळ काटेरी झुडपात एका लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला. यावेळी त्यांनी याठिकाणी पाहणी केली असता त्यांना नवजात स्री-जातीचे अर्भक आढळून आले. या घटनेमुळे यावल परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, मजूरांनी तातडीने यावल पोलीसांशी संपर्क करून या घटनेची माहीती दिली. यावल पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून या नवजात बालकाला तातडीने ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याप्रकरणी शेतमजूर महिला लक्ष्मी धनराज भिल (वय-२६) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात माता-पित्यावर यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजमल पठाण करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज