देवदर्शन करून घरी परतणाऱ्या पिता-पुत्रावर काळाचा घाला; दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । फैजपूर-भुसावळ रस्त्यावरील पिंपरूड फाट्याजवळ देवदर्शन करून मोटरसायकलवर घराकडे परतणाऱ्या पिता पुत्राचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल घडली. गोपाळ गेंदराज पाटील (६६) ,खेमचंद गोपाळ पाटील (३३, गुरुदत्त कॉलनी) असे अपघातात ठार झालेल्या पिता पुत्राचे नावे आहेत.

याबाबत असे की, गोपाळ पाटील व त्यांचा मोठा मुलगा खेमचंद पाटील हे दोघे दर अमावस्येच्या दिवशी चिखली येथील शेतात दिवा लावणे व पूजेसाठी जायचे. त्यानुसार शनिवारी अमावस्या असल्याने दोघे सकाळीच दुचाकीने चिखली येथील शेतात गेले. तेथील पूजाविधी आटोपला. यानंतर ते दुचाकीने (एमएच १९ डीबी ५४४२)ने फैजपूरकडे परतत असताना पिंपरुड फाट्यावरील सोनम एंटरप्राइजेस जवळ आमोद्याच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात गोपाळ पाटील हे जागीच ठार झाले. तर त्यांचा मुलगा खेमचंद पाटील हा गंभीर जखमी झाला. खेमचंद पाटील यांना उपचारासाठी जळगाव येथे घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तात्काळ सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखडे, फौजदार रोहिदास ठोंबरे व त्यांचे सहकारी अपघात ग्रस्त ठिकाणी भेट देऊन चौकशी केली. याप्रकरणी फैजपूर पोलिसांत अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल झाला.

दरम्यान, अपघातात पिता-पुत्र ठार झाल्याने फैजपुरात शोककळा पसरली. खेमचंद पाटील यांच्या पश्चात आई, लहान भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे. वडील आणि मुलावर सायंकाळी फैजपूर येथे अंत्यसंस्कार झाले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -