विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा; राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२१। काही महिन्यांपूर्वी आलेल्या चक्री वादळामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. असे असतांनाही विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना हेक्टरी ४०० ते २ हजार रुपयांपर्यंतच नुकसान भरपाईची विमारक्कम दिली जात आहे. ही एक प्रकारची थट्टाच असून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी साठ हजार रुपये भरपाई देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे तहसीलदार श्वेता संचेती यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला आहे.

निवेदनात, मुक्ताईनगर तालुक्यातील उंचदे, मेंढोळदे, पुरनाड, शेमळदे, नायगाव, मेळसांगवे सह परीसरात २७ मे रोजी झालेल्या चक्री वादळामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी संपुर्ण केळी बागा जमिनदोस्त होऊन १००% नुकसान झाले आहे. असे असतानाही झालेल्या नुकसानीची पुरेशा प्रमाणात भरपाई विमा कंपनीकडून मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तिव्र नाराजी व्यक्त होत आहे. विमाधारक केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ४००, ५००, १०००, २००० अशाप्रकारे नुकसान भरपाईची विमा रक्कम दिली जात आहे. ही एक प्रकारची थट्टा असून हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अपमान आहे. काही शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची तक्रार दाखल केली आहे, मात्र त्यानंतरही विमारक्कम मंजुर झालेली नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

अशी आहे मागणी
शेतकऱ्यांचा विमा मंजुर करण्यात यावा व सरसकट हेक्टरी ६० हजार रुपयेप्रमाणे भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन देतेवेळी उपजिल्हा प्रमुख ऍड. पवनराजे पाटील, सारंग राजे, योगेश पाटील, पवन डापके, सुनिल भोई, निखिल पाटील, उध्दव पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज