शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : ‘या’ तारखेपर्यंत आपली ई-पीक पाहणी पूर्ण करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२१ । शेतकऱ्यांच्या सहभागाने मोबाईल ॲपच्या आधारे शेतकऱ्यांनी स्वत: पीक पेरणीची माहिती स्वतः ऑनलाईन करण्यासाठी ई – पीक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून राज्यभरात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ 13 ऑगस्ट 2021 रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यास शेतकऱ्यांनी शासनाने त्यांच्यावर दाखविलेला विश्वास सार्थक करून दाखविला आहे. त्यामुळे या ई-पीक पहाणी प्रकल्पाचे कामकाज 100 टक्के पूर्ण होण्याच्या दृष्टीकोनातून सर्व शेतकऱ्यांनी 14 ऑक्टोबरपर्यंत आपली ई-पीक पाहणी पूर्ण करावी. त्यात काही अडचणी आल्यास आपल्या गावातील तलाठ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.

क्षेत्रीय स्तरावरून वास्तविक वेळेत पिकांची माहिती संकलित करणे, तसेच सदर माहिती संकलित करतांना पारदर्शकता आणणे, पीक पहाणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे, शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या सरकारी योजनांच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी सदर माहिती वापरणे हे या प्रकल्पाचे उद्दीष्ट आहे. शेतकऱ्यांना देय असणाऱ्या कोणत्याही योजनेचा थेट लाभासाठी ई- पीक पहाणी प्रकल्पातील माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

त्यामुळे कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे याची निश्चित आकडेवारी सहज उपलब्ध होणार आहे. ठिबक, तुषार सिंचन योजना, आधारभूत किंमतीवर धान, कापूस, हरभरा व तूर खरेदी इत्यादी योजनांसाठी या प्रकल्पातील माहिती उपयुक्त ठरणार आहे. रोजगार हमी योजना उपकर व शिक्षण कर यामुळे निश्चित करता येणार आहे. पीक कर्ज , पीक विमा योजना व कृषीगणना यामुळे अत्यंत सुलभ व अचूकरित्या पूर्ण करता येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी दिली.

नाशिक विभागात धुळे जिल्ह्यात ई-पीक पाहणीचे कामकाज हे 67.04 टक्के इतके झालेले असुन, जळगाव जिल्हयात ई-पीक पाहणी चे कामकाज हे 59.31 टक्के इतके झालेले आहे. नाशिक जिल्हयात दिंडोरी तालुक्यात ई-पीक पहाणीचे कामकाज हे 94.52 टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात झालेले आहे. तसेच नाशिक जिल्हयातील कळवण तालुक्यात देखील ई-पीक पाहणी चे कामकाज हे 74.56 टक्के इतके झालेले आहे.

जळगाव जिल्हयातील पाचोरा तालुक्यात ई-पीक पाहणी चे कामकाज हे 72.84 टक्के इतके झालेले आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात देखील ई-पीक पाहणीचे कामकाज हे 71.43 टक्के इतके झालेले आहे. विभागातील इतरही तालुक्यात शेतकऱ्यांकडून या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज