धास्ती : शेतमजुरांचा भरदिवसा वाघाशी आमना सामना

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । व्याघ्र अधिवास क्षेत्र असलेल्या वढोदा वनक्षेत्रातील डोलारखेडा येथील शेतमजुरांचा शेतीच्या वाटेवर आमना सामना झाल्याची घटना दि.१७ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. यामुळे शेतमजुरांसह शेतकरी वर्ग धास्तावला असून भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,  तालुक्यातील मौजे डोलारखेडा येथील गजानन पाटील व हे पत्नी साधना यांच्यासह सकाळी १० वाजेच्या सुमारास शेतात जात असतांना दुतर्फा दाट जंगल असलेल्या रस्त्यावर एका पट्टेदार वाघाचा आमना सामना झाला. समोर वाघाला बघताच या दोघांची चांगलीच भांबेरी उडाली. शिवाय वाघ गुरगुल्यामुळे या दोघांचा थरकाप उडाला. काही क्षण वाघ समोरा होता मात्र काही वेळाने वाघ माघारी फिरल्यानतंर दोन्ही पती पत्नीने शेतात न जाता परतीची वाट धरुन घर गाठले.

गावकऱ्यांना याविषयी माहीती मिळताच काही गावकऱ्यांनी  उत्तर डोलारखेडा वनरक्षक जी.बी.गोसावी व वनमजुर यांच्यासह घटनास्थळ गाठले. दरम्यान विशाल सुभाष जाधव व कल्पना सुभाष जाधव या मायलेकांची सुद्धा याच वाघाशी रस्त्याने गाठ पडली. तसेच दुर्योधन देवराम बेलदार यांना पण या वाघाचे दर्शन घडले. यामुळे येथील शेतकरी व शेतमजुरांमध्ये वाघाची भीती निर्माण झाली असुन शेतामध्ये जाण्यास धजावत नसल्याची परीस्थिती निर्माण झाली आहे. वनविभागाचे कर्मचारी यांचे सदर क्षेत्रात अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मौजे डोलारखेडा येथील ग्रामस्थांकडुन होत आहे. वनपाल मुख्यालयी राहत नसून कित्येक दिवस येथील कार्यालय बंद अवस्थेत आहे. शिवाय दक्षिण डोलारखेडा नियतक्षेत्रातील बीटगार्ड नियमित येत नाहीत. सदर वनपरीसरात दहा ते बारा पट्टेदार वाघांचा मुक्त संचार असुन देखील वनक्षेत्रपाल या पदाचा अतिरिक्त कार्यभार मुक्ताईनगर वनक्षेत्रपाल यांचेकडे सोपवुन वनविभाग निर्धास्त असल्याचा स्थानिकांचा आरोप होत आहे.

वन कर्मचाऱ्यांकडून जंगलात नियमितपणे गस्त घातली जात नसून डिसेंबर व जानेवारी या महीन्यात वाघांचा प्रजनन काळ असल्याने वाघ आक्रमक असतात. आज झालेल्या प्रकारामुळे शेतमजुरा़मध्ये भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने वेळीच लक्ष देऊन या समस्या सोडवाव्या अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन गावकऱ्यांमार्फत छेडण्यात येणार असल्याचे वन समिती अध्यक्ष महेंद्र गरुड, विनोद थाटे, ॠषीकेश पाटील यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी म्हटले आहे. दरम्यान

घटनास्थळी धाव घेऊन वनरक्षक जी.बीगोसावी व वनमजुर अशोक पाटील, सिद्धार्थ थाटे यांनी वाघांच्या पाऊलांचे ठसे घेऊन योग्य ती कारवाई करून गावकऱ्यांना समजावले. शेती शिवारात जाणारा रस्ता दोन किमी लांब असुन दुतर्फा दाट जंगल असल्याने वाघाचा अधिवास संभवतो म्हणुन कुणीही एकट्याने न जाता घोळक्याने ये जा करण्याचे आवाहन वनरक्षक यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -