हातातोंडाशी आलेलं पीक समाजकंटकांनी उपटून फेकलं, शेतकरी महिलेने फोडला टाहो

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२१ । आधीच ग्रामीण भागातील शेतकरी येणारे विविध संकटाना तोंड देताना हवालदिल होत आहे. दिवसरात्र मेहनत करून देखील त्याला पुरेसा मोबदला मिळत नाही. त्यातच भडगाव तालुक्यात एका शेतकऱ्याची तब्बल दीड ते दोन एकर शेतातील कपाशी पीक अज्ञान समाजकंटकांनी उपटून टाकलं. हातातोंडाशी आलेल्या आपल्या पिकाचं नुकसान पाहून शेतकरी महिलेने टाहो फोडला. या घटनेने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय.

याबाबत असे कि, भडगाव तालुक्यातील मळगाव येथील रहिवासी मीराबाई उत्तम गायकवाड यांच्या आईच्या मालकीचं तांदुळवाडी शिवारातील हे शेत असून त्यांनी दीड ते दोन एकरात कपाशीची लागवड केली होती. शेतकरी दिवसभर काबाडकष्ट करून पिकांना आपल्या मुलाबाळाप्रमाणे जतन करून वाढीस नेत असतो. एवढी मेहनत करुनही काही समाजकंटकांनी त्यांच्या शेतातील तब्बल दीड ते दोन एकर शेतातील कपाशी पीक उपटून फेकले.

घटनास्थळी झालेले नुकसान पाहून मीराबाई गायकवाड यांचा आक्रोश पाहायला मिळाला. त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांचे हे ओक्साबोक्सी रडणे पाहून उपस्थित ग्रामस्थही भावूक झाल्याचे दिसून आले. घडलेल्या या दुर्दैवी घटनेचे सर्वच स्तरावरून निषेध व्यक्त केला जात आहे. एखाद्या शेतकऱ्याचे एवढे मोठे नुकसान होत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, मीराबाई गायकवाड या आदिवासी भिल्ल समाजातील असून त्यांना न्याय मिळून त्या अज्ञात माथेफिरू व्यक्तीला त्वरीत अटक करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. शेतकऱ्याला प्रशासनाकडून त्वरित मदत मिळावी, अशीही मागणी करण्यात अली आहे.

घटनास्थळी यांनी दिली भेट 

घटनास्थळी सरपंच गुलाब पाटील पोलीस पाटील रेश्मा मरसाळे, तंटामुक्ती अध्यक्ष जयंत पाटील, दीपक पाटील, दादाभाऊ पाटील, स्वप्नील पाटील, प्रताप परदेशी, रतन बैरागी यांच्यासह मळगाव तांदुळवाडी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. नुकसानग्रस्त शेतकरी सचिन गायकवाड स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -