धक्कादायक : शेतमालकाने मजुराला लाथ मारून विहिरीत ढकलले, महिन्यानंतर असा झाला उलगडा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२१ । चाळीसगाव तालुक्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. शेतमालकाने मजुराला मारहाण करत लाथ मारून विहिरीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना तब्बल एक महिन्यानंतर उघडकीस आली. सोमनाथ प्रभाकर पाटील (वय ३५) रा. बोरखेडा असे मृताचे नाव आहे.  प्रवीण उर्फ भिकन पाटील, (रा.बोरखेडा) असे शेतमालकाचे नाव आहे. तर भटू वसंत सोनवणे (रा.कळमडू) असे अटक करण्यात आलेल्यांचे नाव असून हे दोघे संख्ये मेहुणा व शालक आहे.

याबाबत असे की, खेडगाव शिवारातील शेत गट क्र. २२५/२ मधील शेतातील विहिरीत २३ सप्टेंबर रोजी दुपारी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला हाेता. हा मृतदेह अत्यंत कुजल्याने त्याची ओळख पटली नव्हती. याप्रकरणी मेहुणबारे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली हाेती. याप्रकरणाचा तपास सुरु होता.

लाथ मारून शेतातील विहिरीत ढकलले
२१ सप्टेंबर रोजी सकाळी भिकन हा साेमनाथ याला माेटारसायकलवर बसवून खेडगावला घेऊन अाला. त्यानंतर दुपारी सोमनाथ हा दारू पिऊन भिकनच्या शेतात आला. त्यावेळी भिकन पाटील याने तू दारू प्यायला अाला आहे की, काम करायला, अशी विचारणा केली. त्यावर सोमनाथ पाटील व भिकन पाटील यांच्यात हाणामारी झाली. या भांडणात भिकन याने सोमनाथ पाटील याला लाथ मारून शेतातील विहिरीत ढकलून दिले व तो विहिरीत बुडाल्याची माहिती कुणाला न देता घरी निघून गेला अाणि नंतर सोमनाथ हा दारू पिण्यास गेला असता परत आलाच नाही, अशी बतावणीही केली. तर २३ सप्टेंबर रोजी सोमनाथचा मृतदेह विहिरीतून वर आला असता भिकन पाटील याने शालक भटू सोनवणे यास फोन करून या प्रकरणाची कुठेही वाच्यता करू नकाे, असे सांगितले. त्यामुळे भटूनेही ही माहिती पाेलिसांना न देता लपवून ठेवत गुन्ह्यात भिकन पाटील यास मदत केली

आणि असा झाला उलगडा
मृत सोमनाथ याचा विहिरीत मृतदेह सर्वप्रथम भटू वसंत सोनवणे याने पाहिला हाेता. तर मृत सोमनाथ यास दुचाकीवर घेेऊन जाणाऱ्या भिकन पाटील याचा भटू हा सख्खा शालक असल्याचे समाेर अाले. अजबराव पाटील यांनी भिकन पाटील व त्याचा शालक भटू सोनवणे यांच्यावर सोमनाथच्या घातपाताचा संशय व्यक्त केला. हा धागा पकडत पोलिसांनी भिकन पाटील व भटू सोनवणे यांचे मोबाइलचे सीडीआर व एसडीआर मिळवले. आणि दोघांचे जाबजबाब नोंदवले. त्यात ते उडवाउडवीची उत्तरे देत हाेते. २९ राेजी त्यांची चाैकशी केली असता दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.

दरम्यान, याप्रकरणी भिकन पाटील व भटू सोनवणे या दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याची शिताफीने उकल केल्याने मेहुणबारे पाेलिसांचे काैतुक हाेत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज