सततच्या नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२१ ।  सततच्या नापिकी व कर्जाला कंटाळून ३४ वर्षीय तरुण शेतकऱ्याने विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची घटना पाचोरा तालुक्यातील नाईक नगर येथे घडली. अनिल शिवदास चव्हाण (वय-३४) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, नाईकनगर येथील अनिल चव्हाण यांच्याकडे दोन एकर शेती आहे. शेतातील पिके निसर्गाच्या लहरीपणामुळे हाती न आल्याने तसेच आयसीआयसीआय बँकेचे ३ लाख रुपये, महिंद्रा फायनान्सचे दीड लाख रुपये व खाजगी सावकारांचे २ लाख रुपये कर्ज देणे होते. डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर व अतिवृष्टीने हातात आलेले पीक नष्ट झाल्याने संसाराचा गाडा ओढणे मुश्कील झाल्याने हतबल होऊन शुक्रवारी १५ ऑक्टोबर सकाळी स्व:ताचे शेतात कोणतेतरी विषारी पदार्थ सेवन करुन आपली जीवनयात्रा संपवली.

अनिल चव्हाण यांना उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आज उघड्यावर आला आहे. तरी शासनाने योग्य ती मदत करावी अशी मागणी नाईकनगर येथील ग्रामस्थांनी केली आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज