fbpx

मनुष्य आयुष्याच्या शेवटपर्यंत व्यक्तिमत्व सुधारू शकतो : डॉ.प्रदीप जोशी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ जून २०२१ । “विचार ,भावना आणि वर्तन यांच्या संतुलनातून प्रभावी व्यक्तिमत्व घडते,माणूस आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत व्यक्तिमत्त्व सुधारू शकतो,असे मत सुप्रसिद्ध मानस उपचार तज्ज्ञ डॉ. प्रदिप जोशी( जळगाव) यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित, मन  के साथ, मन की बात, विषयांतर्गत पाच दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाइन व्याख्यानमालेत पहिल्या सत्रात ते बोलत होते.

त्यातील, चला डोकावू या मनाच्या गाभार्‍यात, या  विषयावर पहिले पुष्प जळगाव येथील प्रख्यात मानसोपचार तज्ञ व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मानसमित्र विभागाचे राज्य कार्यवाह डॉ. प्रदीप जोशी यांनी गुंफले. मन ही एक संकल्पना आहे हे विशद करताना डॉ. जोशी यांनी सांगितले की, माणसाची बुद्धी, भावना, वासना, स्मरणशक्ती, कल्पना ,जाणीव या स्वरूपाच्या अनेक अभिव्यक्तींमधून व्यक्तीचे मन बनते.हे सर्व मेंदूत असते.  मेंदूत एक हजार कोटीपेक्षा अधिक मज्जापेशी असतात .मेंदूची रचना,  व कार्यपद्धती कशी गुंतागुंतीचे असते, हे त्यांनी प्रत्यक्ष अनेक स्लाईडच्या सादरीकरणातून विशद केले. मोठा मेंदू, लहान मेंदू व मस्तिष्क स्तंभ यांची स्थाने आणि त्यांची कार्येही त्यांनी सांगितली.

मेंदूतील सर्व  जोडलेल्या पेशींना सायनोप्सिस असे  म्हणतात.  चेतासंस्थेच्या पेशींचे हे एक महाप्रचंड जाळे मेंदूत असते. मेंदूचा उजवा भाग शरीराच्या डाव्या भागावर तर मेंदूचा डावा भाग शरीराच्या उजव्या भागावर नियंत्रण ठेवतो. तसेच मेंदूत असलेल्या विविध प्रकारच्या रसायनांचा समतोल बिघडला की, संदेशवहनाचे काम विस्कळीत होते. त्यातून मेंदूच्या त्या भागाकडून नियंत्रित होणाऱ्या भावना व विचार यामध्ये दोष निर्माण होतात  आणि त्यातून विविध मानसिक आजार निर्माण होतात, हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले.

आधुनिक मानसशास्त्राचा जनक डॉ. सिग्मंड फ्राईड यांची यांचे विचारही स्पष्ट करून सांगितले. ईद  म्हणजे पायाभूत अशा  प्राणीमात्रांच्या ठिकाणी असणार्या भूक, लैंगिकता, आक्रमकता अशा संरक्षण व पुनरूत्पादनासाठी आवश्यक प्रेरणांचा समुच्चय  तर सुपरइगो म्हणजे सामाजिक नीती-संकेत पालनाचा भाग आणि या दोघांचा समन्वयासाठी  कार्यरत   भाग म्हणजे इगो, हे त्यांनी समर्पक  उदाहरणांतून स्पष्ट केले. संरक्षणात्मक खेळी कशी खेळली जाते, हेही मनोरंजक पद्धतीने स्पष्ट केले.

श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांपैकी,  माणसाला राग का येतो, *रडणे,हा मानसिक आजार आहे का, भावनांवर नियंत्रण कसे मिळवायचे, मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणजे काय, भावनांक किती व कशाप्रकारे असतो, विद्यार्थ्यांचा भावनांक विकसित करण्याकरिता काय केले पाहिजे आणि ते का गरजेचे आहे, हे त्यांनी  अतिशय सोप्या भाषेत सांगितले.

या ऑनलाइन  व्याख्यानमालेत जवळपास 500 जण सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महा.अंनिसचे  जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर कट्यारे, स्वागत प्रमोद भारुळे (अहमदनगर), सूत्रसंचालन रवींद्र पाटील नंदुरबार तर प्रा. सुशील कुमार इंदवे, ( नाशिक) यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  महाराष्ट्र अंनिसच्या मानस मित्र, विविध उपक्रम आणि सोशल मीडिया  या विभागांचे राज्यकार्यवाह व पदाधिकारी त्यामध्ये, नंदकुमार तळाशीलकर, नितीनकुमार राऊत , विनायक सावळे , अवधूत कांबळे,अनिल  करवीर, किर्तीवर्धन तायडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt