काळ बदलला तरी ग्रंथांचे मूल्य, वाचनाचे महत्त्व कमी होणार नाही : डॉ. वीरा राठोड

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२१ । माणसाला विवेकी बनविण्यासाठी पुस्तके महत्त्वाची आहेत. पुस्तकांची सोबत माणसाचे आयुष्य बदलून टाकते. काळ कितीही बदलला तरी ग्रंथांचे मूल्य आणि वाचनाचे महत्त्व कमी होणार नाही. वाचन हा आत्मशोध आहे. त्यामुळे आपल्याला व्यक्तिमत्व सर्वार्थाने विकसित होते, असे मत डॉ. वीरा राठोड यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई व के.सी.ई. सोसायटी संचालित मू. जे. महाविद्यालयातील मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिवस आभासी पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी चाळीसगाव येथील बी.पी. आर्ट्स महाविद्यालयाच्या डॉ. वीरा राठोड यांनी मार्गदर्शन केले.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, सर्व विषयांवरील ग्रंथांचे वाचन आपण केले पाहिजे, यातून माणूस घडत जातो, पुस्तकं आपला दृष्टीकोन विकसित करतात. आपल्यातील सर्जनशीलता आणि संवेदनशीलता जिवंत ठेवतात. या व्याख्यानात त्यांनी अनेक विचारवंत, लेखक व कवी यांच्या लेखनाचे संदर्भ देत ग्रंथांचे महत्व अधोरेखित केले. कार्यक्रमाला प्राचार्य सं.ना.भारंबे, भाषा प्रशाळा संचालक डॉ.भूपेंद्र केसुर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. विद्या पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रा.गोपीचंद धनगर यांनी केले. कार्यक्रमास मराठी विभागातील डॉ.योगेश महाले, डॉ.विलास धनवे, डॉ.अतुल पाटील, महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी, साहित्य रसिक व विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज