fbpx

महिला स्वच्छतागृहांसंदर्भात स्थापन समितीची बैठक घ्यावी : वैशाली विसपुते यांची मागणी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२१ । जळगाव शहरातील महिला स्वच्छतागृहांच्या मनपा प्रशासनाने स्थापन केलेल्या समितीची गेल्या ५ वर्षापासून एकही बैठक झालेली नाही. शहरात महिला स्वच्छतागृहांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून समितीची बैठक लवकरात लवकर घेण्यात यावी अशी मागणी निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा समितीच्या सदस्या वैशाली विसपुते यांनी महापौर जयश्री महाजन यांच्याकडे केली आहे.

निधी फाऊंडेशनतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातील महिला स्वच्छतागृहांची दुरवस्था बद्दल मी २०१५ पासून लढा देत आहे. मनपा प्रशासन आणि वेळोवेळी आलेल्या सत्ताधारी प्रतिनिधींकडे पाठपुरावा करून देखील तो विषय आजवर मार्गी लागलेला नाही. महिला स्वच्छतागृहांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश पारित केले आहेत.

जळगाव मनपाला याबाबत वारंवार कळवून देखील त्यांनी त्याचे पालन केलेले नाही. तसेच महिला स्वच्छतागृहांबाबत मनपाने एक समिती २०१६ मध्ये स्थापन केली असून मी देखील त्यात सदस्य आहे. समितीच्या स्थापनेपासून आजवर एकही बैठक घेण्यात आली नाही. शहरात उपलब्ध असलेल्या महिला स्वच्छतागृहांच्या आणि व्यापारी संकुलातील प्रसाधनगृहांच्या बाबतीत मनपा प्रशासन प्रचंड उदासीन आहे.

शहर मनपात बसविण्यात आलेल्या सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनबाबत देखील मनपा प्रशासन निष्काळजीपणा करते. जळगाव शहरातील महिला स्वच्छतागृह, समिती, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन यासह महिलांच्या विविध प्रश्नांना आपण हात घालत ते लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी विनंती वैशाली विसपुते यांनी महापौर जयश्री महाजन यांच्याकडे केली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt