राज्य नाट्य स्पर्धेसाठी ३० पर्यंत पाठविता येणार प्रवेशिका

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२१ । शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित राज्य हौशी नाट्य स्पर्धेला १ जानेवारी २०२२ पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दि.१५ ते ३० नोव्हेंबरदरम्यान प्रवेशिका सादर करता येणार आहेत. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्थांनी मुदतीपूर्वी आपली प्रवेशिका सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

६० व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दि.१ जानेवारीपासून राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच राज्य हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धांची अंतिम फेरी १ फेब्रुवारीपासून प्रत्येकी एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. नाट्य स्पर्धेकरीता ३ हजार रुपये इतक्या अनामत रकमेचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे नावे पाठवावयाचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येईल.

या ठिकाणी सादर करता येतील प्रवेशिका
नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या www.mahasanskruti.org या संकेतस्थळावर नवीन संदेश या मथळयाखाली उपलब्ध होतील. मुंबई, कोकण व नाशिक विभागातील संस्थांनी आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका दि. ३० नोव्हेंबरपर्यंत संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, मुंबई-३२ (०२२-२२०४३५५०) या पत्त्यावर, पुणे महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, बंगला क्रमांक-४, विमानतळ रोड, पुणे (०२०-२६६८६०९९) या पत्त्यावर, औरंगाबाद महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, रुम नंबर-०२, एमटीडीसी बिल्डिंग, गोल्डी टॉकीजच्या समोर, स्टेशन रोड, औरंगाबाद-४३१००५ (०८७८८८९३५९०) या पत्त्यावर तर नागपूर व अमरावती महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, द्वारा : अभिरक्षक, मध्यवर्ती संग्रहालय, अस्थायी प्रदर्शन हॉल, तळमजला, सिव्हिल लाईन, नागपूर४४०००१ (०७१२-२५५४२११) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

अशा आहेत अटी
मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत स्विकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास प्रवेशिका अपात्र ठरविण्यात येईल. प्रवेशिकेतील त्रुटींच्या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची नोंद
सर्व स्पर्धक संस्थांनी घ्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज